esakal | तब्बल सहा महिन्यांनंतर सांगोला येथील आठवडी व जनावरांचा बाजार होणार सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

Bailbazar

शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत सांगोला येथील आठवडी बाजार व जनावरांचा बाजार सहा महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गिरीश गंगथडे यांनी दिली. 

तब्बल सहा महिन्यांनंतर सांगोला येथील आठवडी व जनावरांचा बाजार होणार सुरू 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत सांगोला येथील आठवडी बाजार व जनावरांचा बाजार सहा महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गिरीश गंगथडे यांनी दिली. 

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून सांगोला येथील आठवडा व जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. येथील जनावरांचा आठवडा बाजार खिलार गाई, म्हशींसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील आठवडे बाजारात राज्यातील विविध भागांतून जनावरांच्या खरेदीसाठी व्यापारी व शेतकरी येत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे हा बाजार देखील बंद होता. आता सहा महिन्यांनंतर रविवार (ता. 25) पासून पुन्हा येथील जनावरांचा बाजार व आठवडी बाजार शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत सुरू होणार आहे. 

जनावरांच्या बाजारामध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांना आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असून, बाजारामध्ये सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करण्यात येणार आहे. बाजारामध्ये व्यापारी, शेतकरी, ग्राहकांना थुंकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखुजन्य पदार्थही सेवन करण्यास कडक निबंध करण्यात आले आहेत. बाजार समितीच्या आवारामधील गाळेधारक व त्यांच्याकडील कर्मचारी यांची आवश्‍यकतेनुसार कोव्हिड चाचणीही करण्यात येणार आहे. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींना आवश्‍यक व आरोग्याचे कारण वगळता बाजाराच्या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आली आहे. बाजारात कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची लगेच कोव्हिड चाचणी करण्यात येणार आहे. 

याबाबत सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जनावरांचे बाजार भरविण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती कृषी उत्पन्न बाजार समितीला ठरवून दिली असून त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. बाजारात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे जरुरीचे आहे. 

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गिरीश गंगथडे म्हणाले, सहा महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या जनावरांच्या बाजारामध्ये व्यापारी, शेतकरी व ग्राहकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बाजार समिती याबाबतच्या सर्व बाबींवर लक्ष ठेवणार असून सॅनिटायझर, मास्क व सुरक्षित अंतर ठेवण्यावर अधिक भर देण्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. जनावरांच्या बाजारात गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top