"त्या' वक्तव्यावरून मंत्री वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध 

श्रीनिवास दुध्याल 
Tuesday, 26 January 2021

वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता व्हायचे असेल तर खुशाल व्हावं, मात्र मराठा आरक्षण दिलेला मागासवर्गीय आयोग खोटं आहे, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यामधून ओबीसींचे नेतृत्व करावे, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिलं. 

सोलापूर : कॉंग्रेसचे नेते, राज्याच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. सोलापुरातही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनसमोर विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा देत, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. 

वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता व्हायचे असेल तर खुशाल व्हावं, मात्र मराठा आरक्षण दिलेला मागासवर्गीय आयोग खोटं आहे, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यामधून ओबीसींचे नेतृत्व करावे, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिलं. 

सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनसमोर आंदोलन करीत विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कॉंग्रेस पक्षाने विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केली. 

... तर महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेसह फिरावे लागेल 
या वेळी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय माऊली पवार म्हणाले, मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची मुले उपोषणाला बसली आहेत. आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अख्खं गाव कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. त्या जालन्यात जाऊन मंत्री वडेट्टीवार यांनी, गायकवाड आयोगाचा मागासवर्गाचा अहवाल हा बोगस आहे, असं वक्तव्य करून तमाम मराठा समाजाचा, गायकवाड आयोगाचा, विधिमंडळाचा व उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ कॉंग्रेस भवनसमोर तीव्र आंदोलन केले आहे. आज कॉंग्रेस भवनच्या बाहेर आहोत, यापुढे वडेट्टीवार यांच्या घरात घुसून आंदोलन करू. तुम्ही आमच्या नादाला लागू नका, ही कष्टकरी व कामगारांची पोरं आहेत. या पोरांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्रास देत असाल तर याद राखा. आरक्षण कोणाला किती वाटप करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यासाठी मागासवर्ग आयोग आहे, उच्च न्यायालय आहे. मुळात हा अहवाल मांडण्यात आला होता त्या वेळी झोपले होते का? त्या वेळी का पाठिंबा दिला? तुम्हाला ओबीसीचा नेता व्हायचे असेल तर खुशाल व्हा, मात्र मराठा समाजाला डावलल्यास वडेट्टीवार, तुम्हाला महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेसह फिरावे लागणार. तुमची पळता भुई कमी होणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation of the Skal Maratha Samaj against Minister Vijay Vadettiwar