पत्ते खेळण्याच्या नादात बारावीत नापास; आता वित्त व लेखा विभागात सहाय्यक संचालक

Amol Aamale
Amol Aamale

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : शाळा शिकत असताना वाईट व्यसनांची सवय लागते, परंतु वेळीच त्याला आळा घातला तर त्यातून सुटका होते. ध्येय साध्य करता येते. अन्यथा वेळ हातून निघून गेल्यावर पश्‍चात्ताप करण्याशिवाय काही उरत नाही... असे आपण कित्येक जणांकडून ऐकलेले आहे. अशीच काहीशी घटना करमाळा तालुक्‍यातील साडे येथील एका युवकाबाबत घडलेली असून, बारावीचे शिक्षण घेत असताना पत्ते खेळण्याच्या नादात सहापैकी पाच विषयात नापास झालेला असताना, मोठ्या भावांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला कलाटणी देऊन 2017च्या राज्यसेवेच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आज सहाय्यक संचालक म्हणून वित्त व लेखा विभागात कार्यरत आहे. अमोल आमले असे त्या युवकाचे नाव. 

अमोल आमले यांचे कुटुंब पाच भावंडांचे. वडील सीमांत शेतकरी. उत्पन्नाचा एकमेव स्रोत शेती होती. परंतु त्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच पाच भावंडांचे शिक्षण पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे आईवडील दुसऱ्यांच्या शेतात काम करत. तसेच मोठ्या भावाने नववीमधून शिक्षण सोडून दिले व त्याची स्वप्ने अमोल यांच्याकडून पूर्ण व्हावीत म्हणून वयाच्या 15व्या वर्षांपासून हॉटेलमध्ये मासिक 500 रुपयांवर वेटरच्या कामापासून ते टेलरची कामे करून मिळालेल्या पैशामधून अमोल यांच्या शिक्षणासाठी मदत करीत असे. लहानपणापासून घरची परिस्थिती खूपच बेताची होती, त्यामुळे इयत्ता चौथीपासून शनिवार, रविवार व सकाळ संध्याकाळी घरी असलेल्या शेळ्या राखत असे. 

इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण करमाळा तालुक्‍यातील साडे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर अकरावीसाठी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. परंतु इयत्ता बारावीमध्ये अभ्यास कमी आणि पत्ते खेळण्याच्या सवयीमुळे सहापैकी पाच विषयांमध्ये नापास झाले. त्यानंतर बारावीला विज्ञान शाखा सोडून वाणिज्य शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन बारावी पास झाले. 

बारावीनंतर आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी पार्टटाईम काम करायला लागले. परंतु बीकॉमच्या पहिल्या वर्षामध्ये पुन्हा चार विषयांत नापास तर बाकी दोन विषयांमध्ये 35 गुण मिळाले होते. त्यानंतर मोठ्या भावाने काम सोडून शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. परंतु सकाळी कॉलेज व नंतरच्या फावल्या वेळात पुन्हा पत्त्यांचे डाव रंगू लागले. यामुळे वाणिज्य शाखेची पदवी एटिकेटी घेत घेत 49 टक्के घेऊन पास झाले. पत्ते खेळण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे गावातीलच एका पतसंस्थेमध्ये काम करू लागले. आपला लहान बंधू वाया जातोय याची कल्पना मोठ्या बंधूंना आल्यामुळे अमोल यांना ते मुंबईला घेऊन गेले अन्‌ इथूनच अमोल यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली. 

मुंबईला मुंबई विद्यापीठाच्या भारती विद्यापीठ कॉलेजमधून एमबीएचे अमोल यांनी शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार पूर्णवेळ मन लावून अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेची मुलाखत दिली. परंतु अंतिम निकालामध्ये यश मिळू शकले नाही. त्याचवेळेस केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली. तेथेही अपयश आले होते. या अपयशाने खचून न जाता ते अभ्यास करत गेले आणि प्रथम मंत्रालयामध्ये सहायक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली तर 2017 च्या राज्यसेवा परीक्षेमधून सहायक संचालक, वित्त व लेखा सेवा या पदावर निवड झाली. 

या यशाबद्दल अमोल आमले म्हणाले, मोठ्या बंधूंमुळे मोठी स्वप्नं पाहिली, शिकलो. प्रथम कॉन्स्टेबल होण्याचं स्वप्न होतं. परंतु मोठ्या बंधूंनी दिलेल्या प्रेरणेमुळे एमबीए करून मोठ्यास नोकरीची ऑफर आली असतानाही एमपीएससीकडे वळालो. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड व सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड या दोन्ही बंधुतुल्य मित्रांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व प्रवासात माझे कुटुंबीय विशेषतः माझे मोठे बंधू रवी आमले ज्यांनी स्वत:ची स्वप्ने माझ्यामध्ये पाहिली. माझ्या वहिनी कांचन आमले तसेच गुरू व्यंकटेश कुलकर्णी, पत्नी पायल, माझे मित्र गणेश आवताडे, मंगेश आरळकर, राजीव बाबळे, विनोद लोंढे यांनी खूप सहकार्य केले. 

युवकांसाठी अमोल आमले यांचा मोलाचा संदेश 
यश मिळविण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती, आपण खेड्यांमध्ये राहतो का शहरांमध्ये, आपली शैक्षणिक पात्रता काय आहे या गोष्टींचा इतका परिणाम होत नाही जितका परिणाम आपली ध्येयशक्ती आणि चांगले मित्र, चांगला सहवास, परिवारातील सदस्य यांच्यापासून मिळणारी प्रेरणा यामुळे होतो. मोठ्या भावाने स्वतः अपार कष्ट झेलून मला पुढे जाण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. आई-वडील अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी कधी माझ्या यशाबद्दल संशय व्यक्त न करता नेहमीच प्रोत्साहन दिले. मंत्रालयात असताना रोजचा लोकलचा प्रवास, कार्यालयातील कामकाज यामुळे आपला पुढचा अभ्यास होणार नाही या भावनेतून खचून न जाता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. त्यामुळे एक सांगावेसे वाटते, की प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट आपणास यशापासून रोखू शकत नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com