त्याला "समर्थ' व्हायचं आहे ! अस्थिव्यंग युवकाची स्वावलंबित्वासाठी धडपड

Samarth
Samarth

सोलापूर : समर्थ सिद्धेश्‍वर बिराजदार, वय 19 वर्षे. खेळण्याबागडण्याच्या वयातच विचाराने पोक्त असलेल्या समर्थला स्वावलंबी होऊन खऱ्या अर्थाने "समर्थ' व्हायचे आहे. समर्थ जन्मापासून अस्थिव्यंग. वडील नाहीत. आई एसटीत वाहकाची नोकरी करते. नोकरी करणाऱ्या आईला प्रपंचात मदत व्हावी, यासाठी खेळण्याबागडण्याच्या वयात समर्थ व्यावसायिक झाला आहे. आईच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी समर्थने इतर युवकांसमोर नवा आदर्श ठेवत गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वावलंबनातून आर्थिकदृष्ट्या त्याला समर्थ व्हायचे आहे. 

सुचित्रा बिराजदार यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. प्रपंचाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. कलाशिक्षकाचे प्रशिक्षण घेतलेल्या सुचित्रा बिराजदार यांनी एसटी महामंडळात वाहकाची नोकरी पत्करली व दिव्यांग समर्थला योग्य शिक्षण व संस्कार दिले. आईच्या संस्कारामुळे समर्थला उमलत्या वयातच जबाबदारीची जाणीव झाली. त्याने मंगळवार पेठेतील घरातच गणेशमूर्तींची विक्री सुरू केली आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव होणार नसला तरी घराघरांत गणेशपूजन होणारच. यासाठी सामाजिक अंतर राखत समर्थने राहत्या घरीच गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. आपण दिव्यांग असलो तरी परावलंबी नसावे, स्वत:च्या पायावर उभारावे यासाठी समर्थची ही सारी धडपड आहे. 

अपंग कल्याणकारी संस्था, वानवडी, पुणे येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेला समर्थ यंदा अकारावीत प्रवेश घेतो आहे. समर्थ दहावीत 57 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला असून, शिक्षणाबरोबरच समर्थ लॉकडाउनच्या संकटाचे रूपांतर संधीत करतो आहे. आपण दिव्यांग असलो तरी आपल्याकडे कोणी सहानुभूतीने पाहायला नको, असे त्याला वाटते. त्याला स्वावलंबित्व हवे आहे. यासाठीच त्याची ही धडपड आहे. 

नातेवाइकांच्या आर्थिक मदतीने समर्थने आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. नातेवाईक आकाश मस्के आणि बसवेश्‍वर गावडे यांनी त्याला मूर्ती खरेदी करण्यासाठी मदत व विक्री करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. यंदा त्याने चाळीस गणेशमूर्ती खरेदी केल्या आहेत. पाचशे ते एक हजार रुपये किमतीच्या गणेशमूर्ती त्याने विक्रीसाठी ठेवल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com