खाकी वेशातील देवदूत! गॅस टॅंकर चालकास आली झीट; चौगुलेंनी थांबविला चालता टॅंकर

20200912_150412.jpg
20200912_150412.jpg

सोलापूर : सकाळचे साठेआठ वाजले होते. मुंबई ते सोलापूर हे अंतर रातोरात पार करुन गॅसने भरलेला टॅंकर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर आला. टोल भरुन एका मागून एक, असे चार टॅंकर पाकणी डेपोच्या दिशेने निघाले. त्याठिकाणी पोहचल्यावर निवांत आराम करता येईल, या आशेने तीन टॅंकर पुढे गेले. मात्र, शेवटी असलेला टॅंकर नागमोडी अंगावर येत असल्याची जाणीव तेथील ड्यूटीवर असलेले महामार्ग पोलिस कर्मचारी संजय विठोबा चौगुले यांना झाली. त्यांनी तत्काळ टॅंकरच्या दिशेने धाव घेतली आणि पाहिले तर काय, चालकाच्या हाती टेरिंग नव्हतीच. त्यांनी कोणताही विचार न करता ते टॅंकरवर चढले. चालकाचा ऍक्‍सिलेटरवरील पाय काढून आपला पाय ब्रेकवर ठेवला आणि टॅंकर जागेवरच थांबविला अन्‌ पुढील मोठा अनर्थ टळला.

ठळक बाबी...

  • मुंबईहून गॅसने भरलेला टॅंकर पाकणी डेपोवर निघाला होता
  • सावळेश्‍वर (ता. 12) टोल नाका पास केल्यानंतर चालकास आली झिट
  • गॅस भरलेला टॅंकर नागमोडी चालतोय ओळखून महामार्ग पोलिस संजय चौगुले यांनी त्यादिशेने घेतली धाव
  • टॅंकर चालक टेरिंगवर नसल्याचे दिसताच चालत्या टॅंकरवरच चढले चौगुले
  • टोल परिसरातील कॅन्टीनच्या दिशेने जाणारा टॅंकर संजय चौगुले यांनी थांबविला जागेवरच
  • महामार्ग पोलिस विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी पाच हजारांचे जाहीर केले बक्षीस

मुंबईहून गॅसने भरलेले टॅंकर पाकणी येथील भारत गॅसच्या डेपोवर दररोज ये-जा करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. 9) मुंबईहून चार टॅंकर एका मागून एक सोलापुरच्या दिशेने येत होते. सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथील टोल पास करुन तीन टॅंकर पुढे गेले. परंतु, एक टॅंकर मागे होता. टोल भरून तो टॅंकर बूथमधून पुढे पास झाला. मात्र, तो सरळ न येता नागमोडी पध्दतीने इकडे तिकडे असा येऊ लागला. टोलवरील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात यावी म्हणून त्याठिकाणी दररोज दोन शिफ्टमध्ये महामार्ग पोलिस कारवाईसाठी उभे असतात. त्या दिवशीही सात पोलिस कर्मचारी आणि सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय खरात ड्यूटीवर हजर होते. त्यातील संजय चौगुले यांचे त्या टॅंकरकडे लक्ष गेले. टॅंकर तर पुढे येतोय, मात्र चालक दिसत नव्हता. हा थरार तीन ते पाच मिनिटे सुरुच होता. काही क्षणात गॅसने भरलेला टॅंकर टोल शेजारील कॅन्टीनच्या दिशेने जात होता. यावेळी असे का होत आहे, याची माहिती न घेता चौगुले टॅंकरच्या दिशेने धावले. त्यांना टॅंकर चालक त्यांच्या आसनावर बेशुध्द पडलेले पहायला मिळाले. ते स्वत:चा जीव धोक्‍यात घालत टॅंकरवर चढले. चालकाचा ऍक्‍सिलेटरवरील पाय काढला आणि स्वत:चा पाय ब्रेकवर ठेवला. त्यानंतर पोलिसांनी टॅंकरच्या मालकास कॉल करुन हकीकत सांगितली आणि तीन चालक टोलवर पोहचले. त्यांनी टॅंकर पुढे नेला.

खाकी वेशातील देवदूत
वाहनांची लागलेली टोलवरील रांग, सकाळच्या सत्रात कॅन्टीनवर चहा, नाश्‍ता करायला थांबलेले शेकडो लोक, अशा स्थितीत गॅसने भरलेला टॅंकर कॅन्टीनच्या दिशेने जात होता. टॅंकर चालकास झिट आल्याने तो बेशुध्द पडला होता. तो टॅंकर थांबवून मोठा अनर्थ टाळून देवदूत ठरलेल्या संजय चौगुले यांना महामार्ग पोलिस दलाचे अप्पर पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी पाच हजार रुपयांचे रिवार्ड घोषित केले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्यांचे कौतूक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com