
सोलापूरकरांचे वाढले टेन्शन
तेलंगी पाच्छा पेठेतील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती समोर येत असतानाच आज सोलापुरातील रविवार पेठ या दुसऱ्या परिसरातील रुग्ण समोर आल्याने या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले आहे?, सोलापुरात कोरोना आला कसा? या प्रश्नांनी काहूर माजविले आहे.
सोलापूर : सोलापुरातील रविवार पेठेत आज कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून उर्वरित 11 जणांवर उपचार सुरू आहेत. 160 जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट अद्याप प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतला जात आहे. जिल्ह्यात सध्या होम क्वारंटाइनमध्ये एक हजार 87, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये 713 व्यक्ती आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 646 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 486 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यातील 473 जण निगेटिव्ह असून 13 जण पॉझिटिव्ह आहेत. 160 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने रविवार पेठ, जोशी गल्ली हा परिसर पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या क्षेत्रातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून महापालिकेच्या वतीने परिसरातील ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाचा मोठा फौजफाटा रविवार पेठ, जोशी गल्ली परिसरात दाखल झाला आहे.