अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी : आमदार संजय शिंदे 

आण्णा काळे 
Saturday, 10 October 2020

अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली असून, जुन्या सुप्रिम कंपनीचे काम काढून हे काम मे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. या कंपनीला देण्यात आले आहे. महिनाभरात या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. 

करमाळा (सोलापूर) : अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली असून, जुन्या सुप्रिम कंपनीचे काम काढून हे काम मे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. या कंपनीला देण्यात आले आहे. महिनाभरात या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना आमदार संजय शिंदे यांनी सांगितले की, साधारणपणे गेल्या सात वर्षांपासून अहमदनगर - करमाळा - टेंभुर्णी या रस्त्याचे काम रखडल्याने या रस्त्यावर झालेल्या अपघातात करमाळा ते टेंभुर्णी दरम्यान 165 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जातेगाव (ता. करमाळा) ते टेंभुर्णी हा 60 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्याच्या कामाला 2011 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्या वेळी हे काम सुप्रिम कंपनीला देण्यात आले असल्याने या कंपनीने तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे बंधन होते. मात्र सुप्रिम कंपनीवर वेळेत काम करण्याचे बंधन असतानाही या कंपनीने तीन वर्षात हे काम अर्धवट अवस्थेत सोडले. अर्धवट अवस्थेत काम झाल्याने गेल्या सात वर्षांत अनेक अपघात झाले. त्यात अनेकांचे जीव गेले. 

सुप्रिम कंपनीने पंजाब नॅशनल बॅंकेकडून काढलेले कर्ज व बंद पडलेले काम या वादात या रस्त्याचे काम रखडले. यामध्ये या रस्त्याची दुरवस्था होत गेली. मध्यंतरी हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याचीही चर्चा सुरू होती; मात्र हा विषय मागे पडल्याने आपण या रखडलेल्या रस्त्याचे काम होण्यावर पाठपुरावा केला. त्यातून या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा 9 ऑक्‍टोबर रोजी आदेश निघाला आहे. 

2022 पर्यंत रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे कंपनीवर बंधन 
आमदार संजय शिंदे म्हणाले, या रस्त्यावर होणारे अपघात व अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेता आपण आमदार झाल्यानंतर पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात अहमदनगर - करमाळा - टेंभुर्णी या रस्त्याविषयी आवाज उठवला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर करमाळा - टेंभुर्णी या रस्त्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत या विषयावर मार्ग काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. रस्ताचे काम सुरू केल्यानंतर 2022 पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे बंधन संबंधित कंपनीवर असल्याने वेळेत काम पूर्ण होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval for four lane of Ahmednagar to Karmala to Tembhurni road