सुयश जाधव यांच्या कर्तृत्वाचे करावे तरुणांनी अनुकरण : माजी आमदार नारायण पाटील

आण्णा काळे 
Monday, 7 September 2020

माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, घराघरात एकतरी मुलगा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात देशाचं नाव उंचावर नेणारा असावा. सुयश जाधवला दोन्ही हात नसतानाही खचून न जाता जलतरणमध्ये स्वतःचे करिअर करू शकतो, ही गोष्ट निश्‍चित अभिमानाची आहे. विशेष म्हणजे आपला मुलगा दिव्यांग असतानाही जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांचे वडील नारायण जाधव यांनी जे प्रोत्साहन सुयशला दिले हे देखील आदर्शवत आहे.

करमाळा (सोलापूर) : आपल्या शारीरिक अपंगत्वाने व आर्थिक परिस्थितीने खचून न जाता जलतरणपटू सुयश जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्याचे काम केले. सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सुयश जाधवच्या या कर्तृत्वाचे अनुकरण तरुणांनी करावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. 

माजी आमदार पाटील हे जेऊर (ता. करमाळा) येथे जेऊर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तथा अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव यांच्या सत्काराप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती दत्ता सरडे, ऍड. अजित विघ्ने, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, सुनील तळेकर आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, घराघरात एकतरी मुलगा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात देशाचं नाव उंचावर नेणारा असावा. सुयश जाधवला दोन्ही हात नसतानाही खचून न जाता जलतरणमध्ये स्वतःचे करिअर करू शकतो, ही गोष्ट निश्‍चित अभिमानाची आहे. विशेष म्हणजे आपला मुलगा दिव्यांग असतानाही जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांचे वडील नारायण जाधव यांनी जे प्रोत्साहन सुयशला दिले हे देखील आदर्शवत आहे. 

अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव म्हणाले, मी दिव्यांग आहे, या गोष्टीने मला माझ्या आईवडिलांनी कधीही खचून जाऊ दिले नाही. मला जे यश मिळाले त्याचे सर्व श्रेय मला प्रोत्साहन देऊन पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील यांचे आहे. मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरित करणारे माझे वडीलच आहेत. मी माझ्या वडिलांमुळेच घडलो. 

या वेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, अतुल पाटील, ऍड. अजित विघ्ने यांचीही भाषणे झाली. विनोद गरड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष वाघमोडे, धनंजय शिरस्कर आदींनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjuna Award winning international swimmer Suyash Jadhav felicitated at Jeur