मंगळवेढ्याच्या ऑडिटरचा कोल्हापुरातील रुग्णालयाला झटका! रुग्णाचे अडीच लाखांचे बिल आणले केवळ "इतक्‍या' हजारांवर

Hospital_bed
Hospital_bed

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना रोगाचे संकट अनेकांसाठी तापदायक ठरत असले तरी या संकटात अनेकांनी ही संधी आहे समजून सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावण्याचा सुरू प्रयत्न केला आहे. वैद्यकीय बिलाच्या माध्यमातून लुबाडणूक करणाऱ्या कोल्हापूर येथील एका रुग्णालयास मंगळवेढ्याचे सुपुत्र अजित शिंदे यांनी हिसका दाखवत अडीच लाखांचे बिल 85 हजारांवर आणून ठेवले. यावरून अडलेल्या रुग्णांची हॉस्पिटल्सकडून लुबाडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले. 

कोरोना रोगावर औषध नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या रोगाविषयी मोठी भीती निर्माण झाली आहे. या रोगाला अटकाव करण्याच्या दृष्टीने शासनाने मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू केले; परंतु अखेर चीनमधील कोरोना सर्व हद्दी पार करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यांतून येऊन धडकला. अशा परिस्थितीत या काळात संधी समजून पैसे मिळवण्याचा सपाटा लावायला सुरवात झाली आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आघाडीवर ठरले. कोल्हापूर येथे खासगी रुग्णांवर उपचार घेतलेल्या रुग्णाला अडीच लाखांपेक्षा अधिक रकमेचे बिल दिले. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वैद्यकीय बिलातून आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून सुरू होताच या बिलाची तपासणी लेखा परीक्षकांमार्फत होणार असल्याचे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. 

त्याच अनुषंगाने शिक्षण विभागातील लेखापरीक्षकांनी कोल्हापूर येथील एका हॉस्पिटलमधील रुग्णाच्या बिलाची तपासणी केली असता त्यामध्ये तफावत आढळून आली. रुग्णाचे बिल अडीच लाखांपेक्षा अधिक आले. अखेर ऑडिट केल्यानंतर 85 हजार रुपयांचे बिल समोर आले. यावरून रुग्णाच्या खिशाला चाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालयाला या लेखापरीक्षकांनी झटका दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मंगळवेढा येथील अजित शिंदे हे लेखापरीक्षण पथक शिक्षण विभाग, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सोलापूर लेखापरीक्षण पथक शिक्षण विभागात काम केले आहे. कोरोनाच्या संकटामध्ये खासगी दवाखान्यांमध्ये दाखल रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षक म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अजित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com