sakal

बोलून बातमी शोधा

audit

दवाखाने उघडण्यापासून ते रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत व उपचार घेतल्यानंतर माफक दरात दवाखान्याचे बिल यावे यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे दवाखान्याच्या अव्वाच्या सव्वा बिलाच्या तक्रारी आता कमी झाल्या आहेत. शासकीय सेवेतील 21 लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सोलापुरातील 22 रुग्णालयांतील 680 रुग्णांची बिले तपासली आहेत. 26 जुलै ते 19 ऑगस्ट या अवघ्या 25 दिवसांमध्ये लेखापरीक्षकांनी ही कामगिरी केली आहे. 

"यांच्या'मुळे वाचले कोरोनाग्रस्तांचे 33 लाखांचे बिल ! "इतक्‍या' रुग्णांना लाभ

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचे संकट तसे सर्वांसाठीच नवीन. प्रशासन असो की नागरिक, या सर्वांचीच सुरवातीला धांदल उडाली. एकाचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करेपर्यंत दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालेला असायचा. अशा विचित्र परिस्थितीतून आता प्रशासन आणि सर्वसामान्य सावरू लागले आहेत. उपचारापोटी येणाऱ्या लाखो रुपयांच्या बिलामुळे आर्थिक संकटात जात असलेल्या कोरोनाग्रस्तांना महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार दवाखान्यांची बिले तपासण्यासाठी नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांमुळे कोरोनाग्रस्तांचे 33 लाख 40 हजार 864 रुपये वाचले आहेत. 

हेही वाचा : गणेशाची मूर्ती कशी असावी? स्थापना कधी, पूजा कशी करावी? जाणून घ्या पंचांगकर्ते दातेंकडून 

कोरोनातूनमुक्त झालेल्या आनंदासोबतच आता दवाखान्याचे बिल कमी झाल्याचाही आनंद कोरोनामुक्तांना व त्यांच्या नातेवाइकांना मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीत खासगी डॉक्‍टरांनीच दवाखान्यांची दारे लावून घेतली होती. कोरोना झाल्याची भीती आणि त्यातच बेड शिल्लक नसल्याचे उत्तर कोरोनाग्रस्तांची व त्याच्या नातेवाइकांची चिंता वाढवत होते. दवाखाने उघडण्यापासून ते रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत व उपचार घेतल्यानंतर माफक दरात दवाखान्याचे बिल यावे यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे दवाखान्याच्या अव्वाच्या सव्वा बिलाच्या तक्रारी आता कमी झाल्या आहेत. शासकीय सेवेतील 21 लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सोलापुरातील 22 रुग्णालयांतील 680 रुग्णांची बिले तपासली आहेत. 26 जुलै ते 19 ऑगस्ट या अवघ्या 25 दिवसांमध्ये लेखापरीक्षकांनी ही कामगिरी केली आहे. वाढीव बिलाबाबत महापालिकेकडे आलेल्या तक्रारींचाही निपटारा झाला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक ! जुगाऱ्यांमुळे वाढतोय "या' गावात कोरोनाचा संसर्ग 

आकडे बोलतात... 

  • दवाखान्याने लावलेले बिल : 4 कोटी 66 लाख 16 हजार 516 रुपये 
  • लेखापरीक्षणातून निश्‍चित झालेली रक्कम : 4 कोटी 14 लाख 49 हजार 86 रुपये 
  • कोरोनाग्रस्तांची झालेली बचत : 25 लाख 90 हजार 964 
  • लेखापरीक्षक नियुक्तीपूर्वी झालेली बचत : 7 लाख 50 हजार रुपये 
  • रुग्णांची झालेली एकूण बचत : 33 लाख 40 हजार 964 रुपये 

याबाबत महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, शासनाने दिलेल्या आदेशाची आम्ही योग्यप्रकारे अंमलबजावणी केली आहे. सोलापूर महापालिकेने केलेल्या अंमलबजावणीची माहिती राज्यातील इतर जिल्हे व इतर महापालिका घेत आहेत. कोरोनाच्या संकटाने अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी शासनाच्या सूचनेनुसार आम्ही मदतीचा हात दिला आहे. 

उपायुक्त तथा कोव्हिड नियंत्रण कक्ष प्रमुख धनराज पांडे म्हणाले, दवाखान्यातील बिलांची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यापूर्वीही ज्या दवाखान्यांबाबत तक्रारी आहेत, त्या तक्रारींचे निवारण महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी बिले आकारणी आता साचेबद्ध झाली आहे. त्यामुळे वाढीव बिलाबाबत तक्रारी कमी झाल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top