कोरोनातही "येथील' तुरुंग हाउसफुल्ल ! तुरुंगाची क्षमता 141 अन्‌ कैदी 357 म्हणून उभारले तात्पुरते जेल 

तात्या लांडगे 
Saturday, 29 August 2020

झोपडपट्ट्यांमधील कोरोना आता अपार्टमेंट, बंग्लोजमध्येही पोचला आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला; मात्र पूर्णपणे संपला नाही. दररोज शहरात सरासरी 50 रुग्ण सापडत आहेत. शहरातील चोरी, घरफोडी, मटका, खून, हाणामारी अशा गुन्ह्यांमुळे तुरुंगात दाखल होणाऱ्या कैद्यांचे प्रमाणही खूप आहे. त्यामुळे तुरुंग अधीक्षक दिगंबर इगवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या माध्यमातून नव्याने तुरुंगात दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी स्वतंत्र सोय केली आहे. 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग सर्वदूर पसरला असून, शहरातील रुग्णसंख्या सहा हजार 505 झाली आहे. सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची क्षमता 141 असतानाही त्याच्या तिप्पट म्हणजे 357 कैदी ठेवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तुरुंग प्रशासनाने नव्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल उभारले आहे. त्या ठिकाणी दाखल कैद्याला 14 दिवस क्‍वारंटाइन करून पंधराव्या दिवशी त्याची टेस्ट करून त्याला मध्यवर्ती कारागृहात प्रवेश दिला जात आहे. 

हेही वाचा : Breaking! रुग्णसंख्या 17 हजारांवर अन्‌ "जनआरोग्य'चे केवळ साडेबाराशेच लाभार्थी 

झोपडपट्ट्यांमधील कोरोना आता अपार्टमेंट, बंग्लोजमध्येही पोचला आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला; मात्र पूर्णपणे संपला नाही. दररोज शहरात सरासरी 50 रुग्ण सापडत आहेत. शहरातील चोरी, घरफोडी, मटका, खून, हाणामारी अशा गुन्ह्यांमुळे तुरुंगात दाखल होणाऱ्या कैद्यांचे प्रमाणही खूप आहे. त्यामुळे तुरुंग अधीक्षक दिगंबर इगवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या माध्यमातून नव्याने तुरुंगात दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी स्वतंत्र सोय केली आहे. तत्पूर्वी, मध्यवर्ती कारागृहातील तब्बल 60 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या पार्श्‍वभूमीवर तुरुंग प्रशासनाने आता सावध पवित्रा घेतला आहे. तरीही काल तात्पुरत्या जेलमधील दोन कैदी पॉझिटिव्ह आल्याने त्या ठिकाणच्या उर्वरित कैद्यांची ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे नियोजन असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा : सोलापुरात एकाच अधिकाऱ्याकडे पाच गावांच्या प्रशासकाचा कारभार 

ठळक बाबी... 

  • कैद्यांची गर्दी वाढल्याने मध्यवर्ती कारागृहामागे सहा मेपासून सुरू केले तात्पुरते जेल 
  • मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 141 अन्‌ सध्या आहेत तिप्पट (357) कैदी 
  • उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना काळात 108 कैदी अंतरिम जामिनावर सोडले 
  • नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जेलमध्ये 14 दिवस क्‍वारंटाइन बंधनकारक 
  • तुरुंगात सध्या 357 कैदी 

तुरुंगात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना सुरवातीला 14 दिवस ठेवून त्यानंतर कोरोना टेस्ट केली जाते, असे सोलापूर मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक दिगंबर इगवे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the Solapur Central Jail became housefull a temporary jail was set up