वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बॅंक ऑफ इंडियाची मंगळवेढा शाखा अनिश्‍चित काळासाठी बंद 

हुकूम मुलाणी 
Monday, 7 September 2020

बॅंक कर्मचारी, बॅंक मित्रांना नाही सुरक्षा 
कोरोनाच्या संकटामध्ये आरोग्य, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांना अत्यावश्‍यक सेवेचा दर्जा देत शासनाने त्यांना मोठ्या रकमेच्या विम्याचे सुरक्षा कवच दिले. परंतु बॅंकिंग सेवेमध्ये कार्यरत असलेल्या बॅंक अधिकारी व बॅंक मित्र यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच दिले नाही. ते देखील पैसे देण्या घेण्यासाठी आलेल्या गर्दीचा सामना करत आपला जीव धोक्‍यात घालून कामकाज करत आहे. त्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा शहर व तालुक्‍यात कोरोना वेगाने वाढू लागला असतानाच आज वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बॅंक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे बॅंकेने आर्थिक व्यवहार अनिश्‍चित काळासाठी बंद केले आहेत. त्यामुळे बॅंकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या खातेदारांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले. 
कोरोना रुग्णांची संख्या शहर व तालुक्‍यात वाढू लागल्यामुळे रविवारी नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यापारी असोसिएशनची नगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेऊन आज (सोमवार)पासून मंगळवेढा शहर पंधरा दिवस सकाळी 9 ते 2 या वेळेत चालू ठेवून इतर वेळी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर वेळी पैशापासून आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सुट्टीनंतर आज बॅंकेत पैसे काढण्यासाठी खातेदार आले असता बॅंक बंद असल्याचे फलक निदर्शनास आल्यामुळे अनेक खातेदारांना रिकाम्या हाती परतावे लागले. शहरातील बॅंक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त आर्थिक व्यवहार होत आहेत. शाखेमध्ये सॅलिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देखील दिले आहे. अशा परिस्थितीतही खातेदारांकडून सोशल डिस्टन्स पालन न करणे, अनावश्‍यक कामासाठी बॅंकेत येणे, मास्क व्यवस्थित न लावणे यामुळे खातेदाराकडून संसर्गाचा प्रसार झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बॅंक व्यवस्थापनाने अनिश्‍चित काळासाठी आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय स्टेट बॅंकेनेनंतर सर्वात मोठी असलेल्या बॅंक ऑफ इंडियाला याचा फटका बसल्याने खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. 
कोरोनाच्या संकटामध्ये आरोग्य, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांना अत्यावश्‍यक सेवेचा दर्जा देत शासनाने त्यांना मोठ्या रकमेच्या विम्याचे सुरक्षा कवच दिले. परंतु बॅंकिंग सेवेमध्ये कार्यरत असलेल्या बॅंक अधिकारी व बॅंक मित्र यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच दिले नाही. ते देखील पैसे देण्या घेण्यासाठी आलेल्या गर्दीचा सामना करत आपला जीव धोक्‍यात घालून कामकाज करत आहे. त्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Indias Mangalwedha branch closed