
मळेगाव (सोलापूर) : "द बेटर इंडिया' या प्रसिद्ध वेबसाईटने 2020 मध्ये देशातील ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याने देशातील लोकांना प्रेरणा दिली, अशा दहा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे बार्शीचे सुपुत्र, मराठमोळे अधिकारी रमेश घोलप यांच्या कार्यालाही स्थान दिले आहे.
मळेगाव (सोलापूर) : "द बेटर इंडिया' या प्रसिद्ध वेबसाईटने 2020 मध्ये देशातील ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याने देशातील लोकांना प्रेरणा दिली, अशा दहा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे बार्शीचे सुपुत्र, मराठमोळे अधिकारी रमेश घोलप यांच्या कार्यालाही स्थान दिले आहे. त्यांची निवड करताना वेबसाईटने म्हटले आहे, की पदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत असताना रमेश घोलप यांनी तळागाळातील लोकांशी नाळ जोडत जनतेच्या समस्यांची केलेली सोडवणूक तसेच योजनांच्या अंमलबजावणीच्या पलीकडे जाऊन केलेल्या विकासकामांमुळे समाजात सकारात्मक परिणाम निर्माण झाला आहे.
निवड झालेले सर्व अधिकारी वेळ आणि त्यांनी नेमलेल्या पोस्टिंगमध्ये नावीन्यपूर्ण आणि चेंजमेकर असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण, आरोग्यापासून ते स्वच्छतेपर्यंत विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. झारखंडच्या बोकारो जिल्ह्यातील बेरमोचे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत असताना रमेश घोलप यांनी 2015 मध्ये सुमीत नावाच्या नऊ वर्षांच्या मुलाची बालमजुरीतून सुटका केली. तेव्हापासून त्यांनी विविध जिल्ह्यांतील 35 हून अधिक बालकांना बालकामगारीतून मुक्त करीत शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या शालेय जीवनाचा श्रीगणेशा केला. पुढे शाळेत दाखल झाल्यानंतर विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देखील दिला.
रमेश घोलप हे सध्या कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना त्यांनी पाच अनाथ मुलांची नोंदणी सरकारी निवासी शाळांमध्ये केली आहे. इतकेच नव्हे, तर सरकारी लाभ घेण्यासाठी मुलांना आधार आणि रेशन कार्डसारखी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यास त्यांनी मदत केली. तसेच त्यांनी अकरा वर्षांची एक अनाथ मुलगी सपना कुमारीचे पालकत्वही स्वीकारले आहे. याशिवाय त्यांनी या पाचपैकी चार जणांना एकात्मिक बालविकास आणि सुरक्षा योजनेत नोंदणी केली, ज्याद्वारे त्यांना दरमहा दोन हजार रुपये प्राप्त होत आहेत.
आर्थिक परिस्थिती बेताची असताना गरिबीचे, दुःखाचे चटके सहन करत यशाचा माईलस्टोन पादाक्रांत केलेल्या रमेश घोलप यांच्या निदर्शनास आलेली बाब म्हणजे, अनेकांना विविध शासकीय योजनांची माहिती नाही, ज्यामुळे त्यांना अनेकदा नको असलेल्या वाटेने वाटचाल करायला भाग पाडले जाते. रमेश घोलप यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत पथकाद्वारे "सरकार आपके द्वार' (सरकार तुमच्या दारी) हा अभिनव उपक्रम राबवत जनतेच्या विविध समस्यांची सोडवणूक केली. दिवाळीच्या सणात एक लाख रुपयांचे दिवे खरेदी करून कारागिरांची दिवाळी गोड केली. एक संवेदनशील व कार्यतत्पर अधिकारी म्हणून संपूर्ण भारतभर होत असलेली ख्याती आणि एक उत्कृष्ट प्रेरणादायी अधिकारी म्हणून त्यांची झालेली निवड हा बार्शी तालुक्यासह महाराष्ट्राचा गौरव असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल