मोहोळमधील "भीमा'च्या कामगारांची प्रकृती खालावली

राजकुमार शहा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या तीन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणातील नऊ कामगारांची प्रकृती खालावली आहे. पाच जणांना सोलापूर येथील तर चार जणांना मोहोळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

मोहोळ (जि. सोलापूर) ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या तीन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणातील नऊ कामगारांची प्रकृती खालावली आहे. पाच जणांना सोलापूर येथील तर चार जणांना मोहोळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
दुष्काळामुळे भीमा कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने कामगारांचा 19 महिन्यांचा पगार थकला आहे. शेतकऱ्यांची "एफआरपी'चीही काही रक्कम थकली आहे. थकीत असलेला पगार मिळावा यासाठी कामगारांनी यापूर्वीही आंदोलने केली होती, मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. अनेक कामगारांचे प्रपंच केवळ साखर कारखान्याच्या पगारीवर चालत होते. उपोषणातील अनेक कामगार वयोवृद्ध आहेत. त्यामुळे काही जणांना मधुमेहाचा तर काही जणांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी कामगारांकडून होत आहे. 

रुग्णालयात दाखल केलेले कामगार 
उपोषणातील नऊ कामगारांना उपचाराची गरज आहे. उपचारासाठी विजय वायदंडे, ज्ञानेश्‍वर चव्हाण, वसंत मेहेत्रे, दादासाहेब उघडे, अण्णासाहेब पाटील यांना सोलापूर येथे रुग्णालयात दाखल केले आहे. मोहोळमध्ये प्रकाश सोनटक्के, नागनाथ कांबळे, बाळकृष्ण चव्हाण, विष्णू देशमुख हे उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. चेतन ऐवळे यांनी दिली. 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima suger factory worker on hunger strike