भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणाले, सांगोल्यातही जुळवून घेण्याची आमची भूमिका; पण... 

SD
SD

सोलापूर : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर बार्शी तालुक्‍यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला आहे. त्या ठिकाणी असलेली गटबाजी संपविली आहे. आमदार राजेंद्र राऊत व राजेंद्र मिरगणे यांच्यामध्ये समन्वय साधला आहे. सांगोला तालुक्‍यातही जुळवून घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, तो निर्णय ज्या-त्या वेळी घेतला जाईल, असे मत भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांनी "सकाळ'ला सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. 

"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप नेते संतोष पाटील उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, पक्षात कोणतीही प्रकारची गटबाजी नाही. जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या युरियाच्या प्रश्‍नात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनीही पुढाकार घेतला. दुधाच्या आंदोलनावेळी सर्व नेतेमंडळींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे गटबाजीचा विषय राहिला नाही. 

कोरानाचा कहर कमी झाल्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात "गाव तिथे भाजप शाखा' हा उपक्रम आपण राबविणार आहोत. एका दिवसात 10 शाखा सुरू करण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत. पुढील महिनाभरात जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पक्ष संघटन मजबूत करणे, प्रत्येक तालुक्‍यात जिल्ह्याची बैठक घेणे, सांगोल्याचा आमदार भाजपचा करण्यावर आपला भर राहणार आहे. करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्‍यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. एका तालुक्‍यात 700 जणांची कार्यकारिणी होणार असल्याने जवळपास सर्वच कार्यकर्त्यांना पदे मिळणार आहेत, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्या निवडीला पक्षातूनच विरोध होता का? या प्रश्‍नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले. 

दिवाळीपूर्वी सरकार पडेल 
राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दुधाचे दर पडले आहेत. शेतकऱ्यांना खताच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच हे सरकार पडेल, असे भाकितही जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com