लोकांनी टक्कल करून घेतल्याने आता तीन-चार महिने पाहावी लागेल वाट! कोण म्हणाले? वाचाच 

Takkal
Takkal

सोलापूर : लॉकडाउनमध्ये साडेतीन महिने सलून दुकाने बंद असल्याने लोकांना दाढी-कटिंग करण्याची अडचण होती. त्यातल्या त्यात दाढी करता येते पण कटिंग कशी करायची, असा प्रश्‍न सर्वांपुढे होता. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे सलून दुकाने सुरू झाली तरी धोका पत्कारायला नको म्हणून लोकांनी ट्रीमर व ब्लेडने घरच्या घरीच टक्कल करून घेतले. आता दोन आठवडे झाले आमची दुकाने सुरू झाली, पण दिवसभरात तीन-चार ग्राहकांशिवाय व्यवसायच होत नाही. लोकांनी टक्कल करून घेतले, आता त्यांची डोकी वाढायला तीन-चार महिने जातील. तोपर्यंत आम्हाला काही करता येणार नाही... अशी अजब समस्या आता सलून दुकानदारांसमोर उभी आहे. 

साडेतीन महिने सलून दुकाने बंद असल्याने कामगार व मालकांनी प्रशासनासमोर सुरक्षा नियमांचे पालन करून दुकाने सुरू करण्याची हमी दिल्याने महापालिका आयुक्तांनी शहरातील दुकानांना सुरक्षा नियमानुसार व फक्त कटिंग करण्याच्या अटीवर सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. यासाठी मोठ्या सलून दुकानदारांनी सॅनिटायझर, सॅनिटायझर पंप, थर्मल स्कॅनर, ऑक्‍सिमीटर, ग्राहकांसाठी वेगळे मास्क व कटिंग शीट आदी सुरक्षा साहित्यांसाठी 25 ते 30 हजार रुपये गुंतवून व्यवसायाचा पुनरारंभ केला. त्यासाठी कटिंगच्या दरात दुपटीने वाढ केली. एका ग्राहकाचे कटिंग झाल्यानंतर सर्व साहित्य व दुकान सॅनिटाईज केले जात होते. दुकाने सुरू होण्याची वाट पाहणारे ग्राहक मात्र दुकाने सुरू झाल्यानंतर दुकानांकडे पाठ करत असल्याचे सलून दुकानदारांना लक्षात आले. ग्राहकांच्या मनातून कोरोनाची भीती जात नाही का? दर वाढवल्याने ग्राहक फिरकत नाहीत का? ग्राहकांना सलून व्यावसायिकांवर विश्‍वास राहिला नाही का? अशा प्रश्‍नांनी आता सलून व्यावसायिकांची भंबेरी उडत आहे. 

दरवाढीमुळे छोट्या दुकानदारांकडे कल 
याबाबत सलून दुकानदार शेखर कोंडापुरे म्हणाले, काही छोटे दुकानदार सुरक्षा नियमांचे पालन न करता, सुरक्षा साधने न वापरता व दरवाढ न करता 60 ते 70 रुपयांमध्ये कटिंग करत असल्याचे समोर आले. अशा सुरक्षा नियमांचे पालन करणाऱ्या 30 ते 40 दुकानदारांवर महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करून दंडही ठोठावला आहे. मोठ्या दुकानदारांनी कटिंगसाठी दुप्पट दरवाढ केल्यामुळे ग्राहक छोट्या दुकानदारांकडे जात आहेत. मात्र सर्वच दुकानदारांनी सुरक्षा साधने वापरून त्याचा पैसा ग्राहकांकडून वसूल केल्यास सर्वच दुकानदारांकडे ग्राहक येतील. 

दुकाने सुरू करण्यापेक्षा लॉकडाउन बरे होते असे वाटते 
श्री संतसेना नाभिक दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश हडपद म्हणाले, लॉकडाउनमध्ये अनेकांनी ट्रीमर व दाढी करायच्या ब्लेडने टक्कल करून घेतले आहे. त्यांच्या डोक्‍यावर केस उगवण्यास तीन-चार महिने लागतील. काही ग्राहक दरवाढ झाल्याने येत नसतील, मात्र त्यांच्या सुरक्षेसाठीच आम्ही सुरक्षा साधनांची खरेदी केली आहे. आता ग्राहक येत नसतील तर लॉकडाउन बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com