
बार्शी तालुक्यातील उपळे (दु) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पोस्टल मते घेऊन विजयी झालेल्या उमेदवार पल्लवी महानवर यांचं नशीब जोरात आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील उपळे (दु) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पोस्टल मते घेऊन विजयी झालेल्या उमेदवार पल्लवी महानवर यांचं नशीब जोरात आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत नितीन बुरगुटे यांनी 9 मते घेऊन मनीषा वैभव पासले यांचा पराभव केल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी ए. व्ही. तांबट, ग्रामसेवक संतोष आवारे व पोलिस पाटील दीपक बुरगुटे यांनी जाहीर केले.
तेरा जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. मनोज बुरगुटे यांच्या शेतकरी विकास आघाडीने सहा जागांवर, यशवंत बुरगुटे यांच्या परिवर्तन ग्रामविकास आघाडीने चार जागांवर तर सचिन बुरगुटे यांच्या रामेश्वर ग्रामविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे त्रिशंकू झालेल्या ग्रामपंचायतीवर कोणत्या दोन आघाड्या एकत्र येऊन सत्ता हाती घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
मनोज बुरगुटे यांच्या शेतकरी विकास आघाडीने व सचिन बुरगुटे यांच्या रामेश्वर ग्रामविकास आघाडीने आपसातील मतभेद, हेवेदावे विसरून आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजकीय समेट घडवून सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राऊत गटाकडे ठेवण्यात यश मिळवले. या वेळी पल्लवी महानवर या पोस्टल मतांवर निवडून आलेल्या सदस्याची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद माने, किरण सोनवणे, रणजित महानवर, आशाबी मुलाणी, शहनाज जब्बार शेख, मीरा भावेश कसबे उपस्थित होते. गटनेते मनोज बुरगुटे, बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब बुरगुटे, श्याम बुरगुटे, शिवाजी भोसले, बापू तंडे, धनंजय ठोगे, अशोक बुरगुटे, बापू आवटे, गौतम बुरगुटे, बापू कापसे, मयूर ताटे, दत्तात्रय कुरुंद, पिंटू गायकवाड, रामेश्वर शिरगिरे, रहिमान पांगरकर, बापू मुलाणी, गोरख माळी, बापू महानवर, विठ्ठल महानवर उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल