
आमदार रोहित पवार म्हणाले, की जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबत राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले व माजी आमदार असलेले असे अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पोटनिवडणुकीसाठी योग्य व जनतेच्या मनातील उमेदवारालाच पक्षाची उमेदवारी दिली जाईल. त्यापूर्वी मतदारसंघात पक्षाच्या वतीने सर्व्हे केला जाईल.
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे आतापासूनच पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे दिवंगत आमदार भालके यांच्या वारसाला संधी देण्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी मतदारसंघात सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनीच स्पष्टता केली आहे. आमदार पवार यांच्या या वक्तव्यानंतर इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या भाजपात असलेले आमदार व माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. लोकांच्या मनातील उमेदवार दिला जाईल, असेही आमदार रोहित पवार यांनी येथे सांगितले.
रोहित पवार गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. सायंकाळी येथील विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात भाजपचे आमदार व माजी आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही केला. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, की जो योग्य उमेदवार असेल त्यांच्या सोबत राष्ट्रवादी राहणार आहे. सध्या भाजपात आमदार असलेले व माजी आमदार असलेले असे अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पोटनिवडणुकीसाठी योग्य व जनतेच्या मनातील उमेदवारालाच पक्षाची उमेदवारी दिली जाईल. त्यापूर्वी मतदारसंघात पक्षाच्या वतीने सर्व्हे केला जाईल. त्यानंतर उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल.
पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात वीज वितरण कंपनीला 20 हजार कोटींचा तोटा होता. त्यानंतर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर वीज वितरण कंपनीचा तोटा 55 हजार कोटींवर गेला आहे. कोरोनाच्या काळात हाच तोटा 70 हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे कंपनीवर मोठा आर्थिक ताण आहे. तरीही वीज माफीसंदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही आमदार पवार यांनी सांगितले.
या वेळी आमदार संजय शिंदे, "विठ्ठल'चे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले, युवकचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्रेया भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष गणेश पाटील आदी उपस्थित होते.
संपादन : श्रीनिवास दुध्याल