'पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जनतेच्या मनातील उमेदवार !'

Candidates in the minds of the people for the pandharpur assembly by election.jpg
Candidates in the minds of the people for the pandharpur assembly by election.jpg

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या राष्ट्रवादीमधील उमेदवाराबाबत जनतेच्या मनात नेमके काय आहे तेच होणार आहे. जिल्हाध्यक्षांनी भगीरथ बाबत भूमिका स्पष्ट केल्याने उमेदवारी वारसाला मिळणार असल्याचे सुतोवाच सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

स्व.भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसंवाद यात्रेच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजन पाटील हे होते. व्यासपीठावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ.संजय शिंदे, आ.प्रणिती शिंदे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, उत्तमराव जानकर, प्रकाश पाटील, उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राहूल शहा, लतीफ तांबोळी, जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, संभाजी शिंदे, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, अजित जगताप, विजय खवतोडे, नितीन नकाते, दत्ता मस्के, अॅड नंदकुमार पवार, भारत बेदरे, मारूती वाकडे, रामचंद्र वाकडे, मुजम्मील काझी, संगीता कट्टे, दिलीप जाधव, पी.बी.पाटील, अॅड शिवानंद पाटील, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहकारमंत्री म्हणाले की, ज्या विश्वासाने संधी दिली त्याच विश्वासाने जनतेचे काम केले. त्याच्या दमदार आवाजाबरोबर पंढरपूरचे आमदार म्हणून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवायचे. सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्याची तळमळ असल्याने त्यांना विधानसभेत अधिक वेळा संधी मिळायची, म्हणून त्या कामाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.

आ.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, नानाचा दरारा मतदारसंघात नाहीच तर विधानसभेतही होता. ते बोलताना उभारले की सभागृह शांत व्हायचे, त्याची उणीव भासत असली तरी बहीण म्हणून मी भगीरथच्या पाठीशी आहे.

जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील  म्हणाले की,  विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अनेक नावे पुढे येत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसने स्व आ.भालके यांच्या घराबाहेरच्याला संधी दिली तर पक्षाला ही जागा गमवावी लागेल असा इशारा दिला.

चांदापुरी कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर म्हणाले की, जनतेसाठी झटणाऱ्या आ.भालकेसाठी माझ्या निवडणुकीतील दोन दिवस दिले. भले माझा पराभव झाला परंतु त्यानी बलाढ्य शक्तीचा केलेला पराभव मला आनंददायी होता.

जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले, भगीरथ भालकेनाच संधी दिली जाईल ते तुमच्या मनात आहे तेच होणार आहे. पवार साहेबांना सांगून नानाचा वारसदार म्हणून संधी दिली जाईल. बाकी नेतृत्वाकडे लक्ष देवू नका.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके म्हणाले, 35 गावासाठी पाणी आणि गावे कमी करण्याचा घाट घातला, त्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सरकार बदलताच या योजनेत दुरूस्ती करत या गावाला न्याय देण्याची  भूमिका ठेवली. 35 वर्षे समाजाशी जोडलेली नाळ बंद पडू नये म्हणून जनसंवाद यात्रेचे आयोजन केले. कोरोनाशी लढताना तब्येत जपा म्हणून सांगितले तर न ऐकता जनतेशी संपर्कात होते. त्याच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह केल्याने मी तुमच्यासमोर उभा आहे. काहीना वाटते नाना आक्रमक होते, पण भगीरथ शांत आहे. होय मी शांत असलो तरो लढण्याच्या बाबतीत नानासारखाच आक्रमक आहे.

यावेळी प्रास्ताविक पांडूरंग चौगुले यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com