हत्तीज येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल 

कुलभूषण विभूते 
Tuesday, 27 October 2020

हत्तीज (ता. बार्शी) येथे विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा शारीरिक, मानसिक व आर्थिक व्यवहारासाठी जाचहाट केला. तिला विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वैराग (सोलापूर) : हत्तीज (ता. बार्शी) येथे विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा शारीरिक, मानसिक व आर्थिक व्यवहारासाठी जाचहाट केला. तिला विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कल्पना प्रशांत खोबरे असे विहिरीत पडून मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 24) सकाळी आठ ते दुपारी दोनच्या दरम्यान घडली. याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की, हत्तीज येथे अपशिंगा (ता. तुळजापूर) येथील भारत खोचरे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रशांत बाळासाहेब खोबरे (रा. हत्तीज, ता. बार्शी) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. परंतु मला मुलगा व वंशाला दिवा पाहिजे यासाठी नवरा दारू पिऊ लागला. शिवाय रोज शारीरिक व मानसिक त्रास देत माहेरकडून आर्थिक पैशाची मागणी करत त्रास देऊ लागला. याची माहिती कल्पना हिने फोनवरून माहेरच्या लोकांना देत होती. परंतु, तुला दोन मुली आहेत. त्यांच्यासाठी त्रास सहन कर, असे माहेरचे लोक सांग असत. 

सासरी खोबरे हे एकत्रित कुटुंबात राहात असल्याने चुलत सासरा नितीन विश्वनाथ खोबरे, सासू संगीता बाळासाहेब खोबरे हे दोघेही कल्पनावर संशय घेऊन प्रशांत यास मदत करत असत. शिवाय प्रशांत याचेच बाहेरचे अनैतिक संबंध कल्पनास समजले होते. त्यांचा वाढता व रोज होणारा जाचहाट सहन करीत "तुझे वागणे बरोबर नाही, तुला मुली आहेत. आम्हाला प्रशांतला दुसरे लग्न करायचे आहे' असे वारंवार म्हणून मारहाण, शिवीगाळ करीत त्रास देत होते. या त्यांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी तिने आठ वाजता घर सोडले. डिसले यांच्या (हत्तीज, ता. बार्शी) येथील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मरणास पती, सासू व चुलत सासरा असे तिघेजण कारणीभूत ठरले, अशी फिर्याद मीना भारत खोचरे (रा. अपशिंगा, ता. तुळजापूर) यांनी वैराग पोलिसांत दिली. 

शवविच्छेदन रविवारी (ता. 25) वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजित सपाटे यांनी केले. मृतावर हत्तीज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्तीजच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against three persons in connection with the suicide of a married woman in Hattij