esakal | भुकेल्या पिल्लांकडे पोचण्यासाठी "ती' तडफडत होती ! अनेकांचे प्रयत्नही अपुरे पडले; पण...

बोलून बातमी शोधा

Cats

"प्रेमस्वरूप आई... वात्सल्यसिंधू आई' या शब्दाचा प्रत्यय प्रत्येक क्षणाला "तिच्या' आवाजातून येत होता. तिचा पिल्लांकडे पोचण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असताना संवेदनशील माणसांनी तिला पिल्लांची गाठ घालून दिली. अन्‌ आई व पिल्लांची भेट व त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून सगळ्यांना गहिवरून आले. 

भुकेल्या पिल्लांकडे पोचण्यासाठी "ती' तडफडत होती ! अनेकांचे प्रयत्नही अपुरे पडले; पण...
sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : "प्रेमस्वरूप आई... वात्सल्यसिंधू आई' या शब्दाचा प्रत्यय प्रत्येक क्षणाला "तिच्या' आवाजातून येत होता. तिचा पिल्लांकडे पोचण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असताना संवेदनशील माणसांनी तिला पिल्लांची गाठ घालून दिली. अन्‌ आई व पिल्लांची भेट व त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून सगळ्यांना गहिवरून आले. 

लॉकडाउनचा पहिला दिवस व सर्वत्र संचारबंदी आणि आशातच लष्कर भागातील रहिवासी प्रियांका मोहोळकर यांनी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलशी संपर्क साधला आणि एक हृदयद्रावक घटना समोर आली. त्यांच्या घरासमोर असलेल्या महानगरपालिकेच्या कॅम्प उर्दू शाळेच्या वर्गामध्ये एका मांजरीने काही दिवसांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. नुकताच झालेल्या लॉकडाउनमुळे शाळा पूर्णपणे बंद झाली व दुर्दैवाने मांजरीची ती काही दिवसांची पिल्ले वर्गातच अडकून राहिली व आई वर्गाबाहेर राहिली. 

लॉकडाउनमुळे शाळेत कोणीच नाही आणि येथून त्या मातेची पिल्लांपाशी जाण्याची तडफड सुरू झाली. प्रियांका मोहोळकर यांनी हे सर्व जाणून घेतले. काही वेळातच नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य तेथे पोचले आणि प्रयत्न सुरू झाले. वर्गाच्या खिडकीतून मांजरीला आत जाता यावे यासाठी प्रयत्न केला, परंतु खिडकी उंचावर असल्या कारणाने मांजरीला आत जाता आले नाही. काही वेळात तेथे ऍनिमल राहतचे डॉक्‍टराचे प्रयत्न अपुरे पडले. 

नंतर अग्निशामक दलप्रमुख केदार आवटे यांच्याशी संपर्क साधला व अग्निशामक दलाच्या शिडीच्या साहाय्याने आत जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत संपर्क साधला व त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य समजून त्यांनी लगेच शाळेच्या शिपाईला पाठवले व त्यांनी शाळेचा तो वर्ग उघडून घेतला. तेथून त्या मांजरीच्या पिल्लांना बाहेर काढण्यात आले व आईसमोर ठेवले गेले. व्याकूळ झालेल्या आई लगेच पिल्लांना तोंडात धरून दुसऱ्या वर्गात घेऊन गेली. तेथे तिला कोणताही त्रास होणार नाही याची तेथे जमलेल्या सर्वांनी खात्री करून घेतली. पिल्ले व आई सुखरूप राहतील हे जाणले व तेथून परतले. 

ही घटना जर प्रियांका मोहोळकर यांनी आमच्यापर्यंत पोचवली नसती तर त्या मांजरीची निष्पाप गोंडस पिल्ले भूकबळीने तडफडून वर्गातच त्यांचा शेवट झाला असता. परंतु सुदैवाने वेळेत माहिती मिळाल्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला आणि ती दोन्ही मांजरीची पिल्ले सुखरूप आईजवळ परतली. 

या वेळी मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, ऍनिमल राहतचे डॉ. अजित मोटे, डॉ. सुधाकर ओहाळ, अग्निशमन दलाचे फायरमन राजाराम मोरे, नीलेश माने, तानाजी मंठाळकर, नीलेशकुमार पवार, वाहन चालक दत्तात्रय दुपारगुडे, मोटार मेकॅनिक आयुब शेख, शिपाई सुरेश बडूरवाले तसेच नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल