चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यासमोर मांडला वीज बिलांचा प्रश्‍न 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 18 October 2020

येथील चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष श्री. राजु राठी यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेटुन विविध महत्वाच्या मागण्याचे निवेदन दिले व अनेक प्रश्‍नांवर चर्चा केली. 

सोलापूरः लॉकडाउनच्या कालावधीतील उद्योजक व व्यावसायिकांचे वीज बिलातील स्थिर आकार रद्द करावा व मिटर रिडींगप्रमाणे बिल आकारणीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार केला जाईल असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिले. 

हेही वाचाः शेतकरी ते उद्योजिका सारिका पाटील यांचा प्रवास 

येथील चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष श्री. राजु राठी यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेटुन विविध महत्वाच्या मागण्याचे निवेदन दिले व अनेक प्रश्‍नांवर चर्चा केली. 

हेही वाचाः अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचा सर सय्यद एक्‍सेलन्स पुरस्काराने सन्मान 

यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्याशी चर्चा केली. जिल्हयात अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे मालमत्ता व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले या विषयात अटी नियम शिथिल करुन प्रसंगी निष्कर्ष बदलुन नुकसानीचे पंचनामे त्वरित करुन सर्व शेतकऱ्यांना व मालमत्तेचे नुकसान झालेल्या पिडीतांना शासनाकडुन मदत त्वरीत द्यावी. 
त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. 
तसेच व्यावसायिक व उद्योजकांचे लॉकडाउन कालावधीत तीन महिने व्यवसाय बंद असल्याने त्या कालावधीतील वीज बिलातील स्थिर आकार रद्द करावा. पॉवर फॅक्‍टर पेनल्टी रद्द करावी. मीटर रिडींगप्रमाणे वीज बिल आकारण्यात यावे. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी या संदर्भात कॅबिनेट मिटींगमध्ये निर्णय घेतले जाईल असे सांगितले. 
जीएसटी रिर्टनच्या मुदतीत मार्च 2021 पर्यंत वाढ करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. तसेच एमएसएमई, नॅशनल पेन्शन स्कीम, छोटे व्यावसायिकांचे प्रश्न, मध्यमवर्गीयांचे प्रश्न, एमआयडीसीमधील प्लॉट धारकांचे प्रश्न, मुद्रांक शुल्क बाबतीत प्रश्न, गारमेंट, पॉवरलुम्स, छोटे उद्योजक, हॉटेल, रेस्टॉरन्ट, टुर्स व ट्रव्हलर्स सेक्‍टर, मेडीकल सेक्‍टरचे प्रश्न आदी विषयावर चर्चा झाली. या शिष्टमंडळात चेंबरचे मानद सचिव धवल शहा, संचालक शैलेश बचुवार, संजय कंदले उपस्थित होते. 
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव, उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, महानगरपालिका आयुक्त पी. शिवाशंकर, उपायुक्त धनराज पांडे, आमदार दिपक साळुंखे, दिलीप माने, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, महेश गादेकर, दिलीप कोल्हे आदी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber of Commerce officials raised the issue of electricity bills with the Deputy Chief Minister