महेश कोठे शिवसेनेत अस्वस्थ? कोठेंना मुख्यमंत्र्यांकडून "मातोश्री'वर निमंत्रण 

तात्या लांडगे 
Monday, 26 October 2020

विधानसभा निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करूनही महेश कोठे यांना "मातोश्री'ने आसराच दिला. त्यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून काहीच कारवाई झाली नाही. शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या कोठेंनी महापालिका निवडणुकीत ताकदीची चुणूक दाखवून दिली. तरीही पक्षांतर्गत सततच्या कुरघोडीमुळे नाराज झालेले कोठे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्षही त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करूनही महेश कोठे यांना "मातोश्री'ने आसराच दिला. त्यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून काहीच कारवाई झाली नाही. शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या कोठेंनी महापालिका निवडणुकीत ताकदीची चुणूक दाखवून दिली. तरीही पक्षांतर्गत सततच्या कुरघोडीमुळे नाराज झालेले कोठे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्षही त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसेल, या शक्‍यतेतूनच खुद्द पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना "मातोश्री'वर बोलावल्याची चर्चा आहे. 

कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या कोठेंबद्दलची निष्ठा जपत अमोल शिंदे यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. त्या वेळी शिंदे यांना महापालिकेतील पदाधिकाऱ्याची एखादी गाडी मिळवून देऊ, असा शब्द कोठे यांनी दिला होता. मात्र, पक्षातीलच काही नगरसेवक तसे होऊ नये, कोठेंबद्दलची नाराजी वाढावी, त्यांनी पक्ष सोडून जावा या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दिलीप माने यांना विजयाची संधी असतानाही त्यांना शहर मध्यमध्येच उमेदवारी देण्यात आली. त्यामागे कोठेंविरुद्ध सर्वपक्षीय राजकीय खेळी झाल्याचा सूर निघाला. 

युती असतानाही शिवसेनेतील काही नगरसेवकांनी कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार केला तर काहीजण तटस्थ राहिले, असाही आरोप झाला. त्यानंतरही तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. त्यानंतर महापालिकेचा स्थायी समितीचा सभागृह नेता निवडीवेळीही कोठेंनी गणेश वानकर यांचे नाव देऊन निवडही अंतिम झाली असतानाही सावंतांनी नाव बदलल्याची चर्चा आहे. आता विरोधी पक्षनेता बदलल्यानंतर कोठेंना कुठेही संधी मिळू नये, म्हणून पक्षातील काही नगरसेवक विरोधी पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन कुरघोडी करू लागल्याचा अंदाज कोठेंना आला आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

कोठेंना हवी आहे विधान परिषदेवर संधी 
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर दुसऱ्यांदा आले. त्या वेळी महेश कोठे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोचले. पहिल्या दिवशी दौऱ्यात न दिसलेले कोठे दुसऱ्या दिवशी थेट विमानतळावर पाहायला मिळाले. त्यांना मुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि वेळ घेऊन "मातोश्री'वर येण्यास सांगितले. महापालिका विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा कोठेंना आहे. त्यासाठी बहुतेक नगरसेवकांचा पाठिंबाही असल्याची झलक विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर पाहायला मिळाली. मात्र, पक्षात कोणतीही संधी न मिळाल्यास कोठे पक्ष सोडतील आणि त्यानंतर शहरातील तिन्ही मतदारसंघांत व महापालिकेतही भाजपची ताकद वाढेल, अशी शक्‍यता पक्षातील नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडून कोठेना कोणती संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister extended an invitation to Leader of Opposition Mahesh Kothe