जीएसटी कर संकलनामध्ये उसळी ! लॉकडाउनमध्ये मोठी घट, मात्र गतवर्षीच्या तुलनेत 11 कोटींनी वाढ 

प्रकाश सनपूरकर 
Friday, 11 December 2020

सोलापूर विभागांतर्गत मध्यंतरीचा काळ अत्यंत अस्थिर झाला होता. मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये 189 कोटी रुपयांपर्यंत गेलेले कर संकलन लॉकडाउनच्या काळात चांगलेच घटले होते. सप्टेंबर महिन्यात जीएसटी करसंकलनाचा आकडा 2019 च्या तुलनेत चक्क 11 कोटी रुपयांनी वाढला. 

सोलापूर : सोलापूर विभागाच्या जीएसटी कर संकलनामध्ये कोरोना संकटाचा काळ वगळता आता मोठीच उसळी घेतली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे आकडे वाढले आहेत. शहराच्या अर्थकारणाच्या मजबुतीची मोहोर या आकडेवारीवर उमटली आहे. 

सोलापूर विभागांतर्गत मध्यंतरीचा काळ अत्यंत अस्थिर झाला होता. मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये 189 कोटी रुपयांपर्यंत गेलेले कर संकलन लॉकडाउनच्या काळात चांगलेच घटले होते. सप्टेंबर महिन्यात जीएसटी करसंकलनाचा आकडा 2019 च्या तुलनेत चक्क 11 कोटी रुपयांनी वाढला. 

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कर संकलनाचा आकडा 2019 च्या तुलनेत आठ कोटी रुपये कमी होता. मात्र नकारात्मक स्थितीत मागील वर्षीइतका कर संकलनाचा आकडा गाठला जाईल, असा यंत्रणेला विश्वास वाटत होता. मात्र प्रत्यक्षात मागील वर्षाचे आकडेही जीएसटी संकलनाने आता ओलांडले आहेत. ही बाब मात्र अर्थक्षेत्रातील लोकांसाठी काही प्रमाणात आश्‍चर्यजनक होती. याशिवाय लॉकडाउन काळातही सोलापूरच्या कारखान्यांनी कोरोनासाठी आवश्‍यक असलेले पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर निर्मिती करून मोठी उलाढाल केली. त्यातूनही जीएसटी कर संकलनाचा आकडा बऱ्यापैकी स्थिर झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. नकारात्मक आणि संकटाच्या स्थितीमध्ये उद्योजकांचे निर्मितीचे हात थांबले नव्हते, हे या कर संकलन आकडेवारीवरून निश्‍चित मानले जात आहे. 

सप्टेंबर महिनाअखेर जीएसटीचा आकडा 35 कोटी 88 लाख एवढा होता, तो 2019 च्या तुलनेत 11 कोटी रुपयांनी वाढला आहे. लॉकडाउनच्या काळात जीएसटीच्या संकलनामध्ये 2019 च्या तुलनेत केवळ 60 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली होती. ही तूट आता तीनच महिन्यांत भरून निघेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या बाजारपेठेचा आर्थिक उलाढालीचा वेग काही पटींनी वाढेल, अशी चिन्हे आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये सहकारी पतसंस्था आणि बॅंकांनी देखील आर्थिक उपाययोजनांमधून कोरोना संकटाचे उत्तम व्यवस्थापन केले. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापार क्षेत्रानेही केलेल्या व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे. कोरोना संकटामुळे सोलापूर हे देशात आठव्या क्रमांकाचे अधिक संसर्ग असलेले शहर होते. तरीही सोलापूरकरांच्या व्यवस्थापनाच्या आधारावर अर्थकारणाची गती बऱ्यापैकी स्थिर झाली. उद्योगांची निर्मिती, थेट ग्राहक नसताना माल वाहतुकीद्वारे केलेली उलाढाल आणि शेतीच्या भक्कम कामगिरीमुळे सोलापूर विभागाचे अर्थकारण टिकून राहिले. 

जीएसटी संकलनाचे आकडे (कोटीमध्ये) 
वर्ष 2019 : 

 • एप्रिल : 31 
 • मे : 27.96 
 • जून : 43.92 
 • जुलै : 30.31 
 • ऑगस्ट : 31.71 
 • सप्टेंबर : 24.72 
 • ऑक्‍टोबर : 25.60 

वर्ष 2020 : 

 • एप्रिल : 6.61 
 • मे : 8.93 
 • जून : 29.25 
 • जुलै : 25.53 
 • ऑगस्ट : 22.95 
 • सप्टेंबर : 35.88 
 • ऑक्‍टोबर : 33.45 

ठळक बाबी 

 • वर्ष 2019 च्या तुलनेत फक्त 71 कोटी रुपयांची तूट 
 • सप्टेंबर व ऑक्‍टोबर 2020 मध्ये मोठी वाढ 
 • दिवाळी व लग्नसराईमुळे आणखी वाढ होण्याची शक्‍यता 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compared to last year GST tax collection has increased by Rs 11 crore this year