ई-पासची अट हटली तरी लॉजिंग क्षेत्राला प्रतीक्षा मंदिरे उघडण्याची 

Lodging
Lodging

सोलापूर : शासनाने ई-पासची अट काढली तरी देवस्थाने बंद असल्याने लॉजिंगच्या व्यवसायात अजूनही लॉकडाउनची स्थिती कायमच आहे. पर्यटनाअभावी लॉजिंगसह बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल देखील विस्कळितच आहे. 

सप्टेंबर महिन्यापासून महापालिकेने हॉटेल व लॉज व्यवसायाला परवानगी दिली. शहरातील हॉटेल सुरळीतपणे सुरू झाले. शहरामध्ये लॉजिंगचा व्यवसाय हा पर्यटनाशी जोडलेला आहे. त्यामध्ये 70 टक्के व्यवसाय हा देवस्थानांशी जोडलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर व सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचा समावेश आहे. 

ई-पासची अट शासनाने आता काढली आहे. पण 70 टक्के पर्यटक देवस्थानांशी जोडलेला असल्याने देवस्थाने सुरू होणे आवश्‍यक आहे. लॉजचा व्यवसाय हा पूर्णपणे वर्षभर बाहेरगावाहूर येणाऱ्या व्यक्ती, प्रवासी, पर्यटक यांच्यावर अवलंबून आहे. पण देवस्थाने सुरू झाल्याशिवाय पर्यटक फिरकण्यास तयार नाहीत. मागील काही महिन्यांतील देवस्थानशी जोडलेले अनेक सण व उत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाउनमुळे रद्द झाले. आता शासनाने लॉजिंग सेवेला परवानगी दिली तरी अद्याप देवस्थाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. लॉज व्यावसायिकांना देवस्थाने सुरू झाल्याशिवाय कोणतेही उत्पन्न मिळणे अशक्‍यच झाले आहे. 

कोरोनाच्या भीतीमुळे देवस्थान पर्यटक सोडून इतर नियमित ग्राहक देखील येत नाहीत. यामध्ये व्यावसायिक, व्यवसाय प्रतिनिधी, कंत्राटदार व नोकरदार हे सर्व ऑनलाइन काम करीत असल्याने शहरातील लॉज व्यवसाय ठप्पच आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत बाहेरगावचा पर्यटक शहरात येत नाही तोपर्यंत सोलापूरच्या बाजारपेठेत बाहेरील भागातून मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत नाहीत. आर्थिक संकटात सापडलेल्या बाजारपेठांच्या संदर्भात देवस्थाने सुरू होण्याची गरज आहे. शहरात येणारा पर्यंटक सोलापुरी चादरी व टॉवेल आवर्जून खरेदी करतो. याप्रमाणे धार्मिक साहित्य खरेदी देखील होत असते. या देवस्थानांना भेट देणाऱ्यांमध्ये पुणे व मुंबई भागातील पर्यटकांची संख्या कोरोना संसर्गामुळे अद्याप तरी सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. या स्थितीत या लॉज मालकांना कामगारांचे वेतन, वीजबिले व कराचा भरणा करावा लागत आहे. 

सोलापूर हॉटेल असोसिएशनचे सदस्य ऋत्विज चव्हाण म्हणाले, लॉज व्यवसायाला परवानगी मिळाली तरी अद्याप ग्राहक नसल्याने केवळ देखभालीचा खर्च करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

सोलापूर हॉटेल असोसिएशनचे सदस्य जगन्नाथ उपलप म्हणाले, देवस्थानांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे देवस्थाने सुरू झाल्यानंतरच लॉजवर थांबणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com