चिमुकल्याची आई, आजीला विनवणी... कोरोनाय ना, मग मला नको आता ओवाळू!

सुस्मिता वडतिले
Saturday, 11 April 2020

सध्या सोशल मीडियावरसुद्धा कोरोनाची माहिती देणाऱ्याच सर्वात जास्त पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याला रोखण्यासाठी सरकारही वेगवेगळे आवाहन करीत आहे. "गर्दी करू नका... घरी सुरक्षित राहा...' हाच विचार करून हा चिमुकला सरकारने केलेल्या आवाहनाला साथ देत आहे. स्वत:चा वाढदिवस आहे तरीही त्यालाही तो नको म्हणत आहे. लहान मुलांच्या मनात कोरोनाबाबतीत भयंकर भीती निर्माण झाली आहे. स्वत:चे घरगुती कार्यक्रम का असेना त्यालाही ते नकार देत आहेत. 

सोलापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाउन लागू केला. या व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. मोबाईल, टीव्ही असो किंवा घरात चर्चा, ती कोरोनाचीच... त्याचा प्रभाव चिमुकल्यांत जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी याचा प्रत्यय आला. सोलापूर जिल्ह्यात एका मुलाचा वाढदिवस होता. त्याचे नाव कार्तिक आहे. तो चार वर्षांचा आहे. वाढदिवस म्हटलं की, नवी कपडे, त्याची ओवाळणी, मुलांना खाऊ वाटप असं चित्र असतं. आई-वडिलांनाही त्याचा आनंद असतोच. असाच आनंद त्याची आई आणि आजीला झाला. त्यांनी किमान घरातल्या घरात तरी त्याचा वाढदिवस साजरा करावा, याची तयारी केली. तेव्हा त्यांना कार्तिक म्हणाला, या वर्षी वाढदिवस केला नाही म्हणून काय झालं. कोरोनाय ना आता. कशाला गर्दी करायची. पुढच्या वर्षी मोठा वाढदिवस करू. 
सध्या सोशल मीडियावरसुद्धा कोरोनाची माहिती देणाऱ्याच सर्वात जास्त पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याला रोखण्यासाठी सरकारही वेगवेगळे आवाहन करीत आहे. "गर्दी करू नका... घरी सुरक्षित राहा...' हाच विचार करून हा चिमुकला सरकारने केलेल्या आवाहनाला साथ देत आहे. स्वत:चा वाढदिवस आहे तरीही त्यालाही तो नको म्हणत आहे. लहान मुलांच्या मनात कोरोनाबाबतीत भयंकर भीती निर्माण झाली आहे. स्वत:चे घरगुती कार्यक्रम का असेना त्यालाही ते नकार देत आहेत. 
कोरोनाच्या भयंकराची जाणीव आपल्याला मोठ्यासोबतच चिमुकल्यांत दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वाढदिवस साजरा करायला नेहमीच आवडते. वाढदिवस म्हटले की प्रत्येकाची तयारी सुरू असते. त्यात कोणते कपडे घ्यायचे, नियोजन कसे करायचे, वाढदिवस कुठे साजरा करायचा, वाढदिवसाला कोणाकोणाला बोलवायचं, अशा एक ना अनेक कल्पना ठरवतात. वाढदिवस म्हणजे "सेलिब्रेशन तो बनता हे' समीकरण ठरलेलं असतं. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा कल लहान मुलांतही दिसून येत आहे. वाढदिवस नातेवाईक, आपले मित्र-मैत्रिणीसोबत साजरा केला जातो. त्यात धमाल-मस्ती ठरलेली असते. त्यावेळी कुणी खाऊ तर कुणी शुभेच्छा तर कुणी खेळणे भेटवस्तू देतात. परंतु या कोरोना महामारीचा विचार करता अनेकांची विचारसरणी बदलत चालली आहे. 
सुरुची साळुंखे म्हणाल्या, मुलगी जिनिशा दोन वर्षांची झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आम्ही कसल्याही प्रकारची गर्दी होऊ नये, यासाठी जिनिशाचा वाढदिवस साजरा केला नाही. 
प्रेमा मुरूमकर म्हणाल्या, कार्तिकच्या वाढदिवसादिवशी ओवाळणी, नवीन कपडे आणि केक नको म्हणून सांगितला. आपण सर्वांना बिस्कीट वाटू. त्यावर कार्तिक म्हणाला, कोरोना जाऊदे, मग आपण एकदम मोठा वाढदिवस साजरा करूया. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona impact on children birthday in Solapur