बापरे..! कोरोनाबाधित डॉक्‍टरच थेट घरी आला अन्‌ गोंधळ उडाला; अखेर विलगीकरण कक्षात केली रवानगी मात्र गावकऱ्यांना घाम फुटला

Corona
Corona
Updated on

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद येथील डॉक्‍टर असणारी व्यक्ती कोरोनाबाधित आहे. या डॉक्‍टरवर मिरज येथे उपचार सुरू होते. मात्र गावातील कोणत्याही प्रशासकीय विभागाला माहिती न देता हा डॉक्‍टर परस्पर महूद येथे घरी येऊन राहिला. या डॉक्‍टरला प्रशासनाने महत्‌प्रयासाने सोमवारी तालुक्‍यातील कमलापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र त्याच्याशी संपर्कात आलेल्यांना मात्र आता घाम फुटला आहे. 

येथील वैद्यकीय व्यवसाय करणारा हा 38 वर्षीय डॉक्‍टर प्रथम कोरोनाबाधित आढळला. तो स्वतःहून मिरज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 21 जुलै रोजी दाखल झाला होता. त्याच्या संपर्कातील कंपाउंडर व एक महिला रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले आहेत. या दोघांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध व तपासणी करण्याचे काम चालू असतानाच, हा डॉक्‍टर रविवारी सायंकाळी गावातील कोणत्याही शासकीय यंत्रणेला, ग्राम कृती समितीला कोणतीही कल्पना न देता प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या आपल्या घरी येऊन राहिला. तो राहात असलेल्या भागातल्या नागरिकांनी डॉक्‍टर कोरोनामुक्त झाल्याचे समजून टाळ्या वाजवून त्याचे जंगी स्वागत केले. कुटुंबीयांनी औक्षण करून स्वागतही केले. 

त्याचा हा व्हिडीओ गावात सर्व समाजमाध्यमांवर रविवारी रात्री फिरत होता. कोरोना महामारीवर मात करून डॉक्‍टर घरी परतले, असा संदेश पसरवला गेला. रात्री उशिरा व्हिडीओ पाहिल्यानंतर ग्राम कृती समितीच्या सदस्यांनी डॉक्‍टराशी संपर्क साधला आणि आपण कोरोनामुक्त झाला आहात का, याची विचारणा केली. त्यावर डॉक्‍टरने उडवाउडवीची उत्तरे देत "तुम्ही यामध्ये पडू नका, मी व येथील वैद्यकीय अधिकारी पाहून घेतो', असे सुनावले. मात्र पोलिस पाटील प्रभाकर कांबळे यांनी पाठपुरावा केल्याने संबंधित डॉक्‍टराने स्वतःचा वैद्यकीय अहवाल पोलिस पाटलांना पाठवून दिला. त्यावर कोरोना पॉझिटिव्ह नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही तुम्ही घरी येऊन का राहिलात, याबाबत विचारणा केली असता संबंधित डॉक्‍टरने टाळाटाळ केली. 

याबाबत सोमवारी येथील ग्राम कृती समितीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्याकडे रीतसर अहवाल पाठवला. तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलिस पाटील यांनी डॉक्‍टरच्या घरी जाऊन "आपण तत्काळ उपचारासाठी दाखल व्हा', असे सांगितले. तरीही डॉक्‍टर ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दुपारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. शेवटी पोलिस यंत्रणेने गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितल्यानंतर सायंकाळी सहा वाजता रुग्णवाहिकेमधून या डॉक्‍टराला कमलापूर येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. संबंधित डॉक्‍टरच्या संपर्कातील इतर रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

याबाबत महूदचे पोलिस पाटील प्रभाकर कांबळे म्हणाले, परस्पर येऊन घरी राहिलेल्या या डॉक्‍टरला ग्राम कृती समिती सदस्यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तुम्ही यात पडू नका, मी व आरोग्य विभाग बघून घेतो, असे तो वारंवार सांगत होता. ग्राम कृती समितीने वरिष्ठांना याबाबत कळविले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com