Corona Ground report : घरात गरम होतयं, बाहेर पोलिस बसून देईनात; झोपडपट्टीतील नागरिकांची व्यथा 

अशोक मुरुमकर 
रविवार, 29 मार्च 2020

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाउन केला आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका, घरातच बसा अशा सूचना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे कामे बंद पडली आहेत. त्यामुळे दिवस कसा घालवायचा असा प्रश्‍न त्यांचा आहे. मोदी झोपडपट्टीत सुमारे दोन हजार बांधकाम कामगार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून काम तर बंद झालेच शिवाय बाहेर पडणेही आवघड झाले आहे.

सोलापूर : वेळ दुपारी 1.30 ची... ठिकाण रेल्वे लाइन झोपडपट्टी... कोण लिंबाच्या झाडाखाली बसलंय तर कोण रस्त्यावरील पदपथावर सावलीला बसलंय...त्यांच्यात एकच चर्चा होती ती म्हणजे किती दिवस "हे' चालणार? काम नाही सुरू झालं तर... काय खाणार, हा प्रश्‍न सध्या त्यांना सतावत आहे. बांधकाम करणाऱ्या कामगारांचे काम आठ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे घरात येणारा पैसा तर बंद झालाच शिवाय घरात बसून उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे आणि बाहेर बसायचे तर पोलिस बसू देत नसल्याचे ते सांगत आहेत. 
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉकडाउन केला आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका, घरातच बसा अशा सूचना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे कामे बंद पडली आहेत. त्यामुळे दिवस कसा घालवायचा असा प्रश्‍न त्यांचा आहे. मोदी झोपडपट्टीत सुमारे दोन हजार बांधकाम कामगार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून काम तर बंद झालेच शिवाय बाहेर पडणेही आवघड झाले आहे. बलराज सलगरे म्हणाले, काम करील तेवढ्याच दिवसाचे आम्हाला पैसे मिळतात. आठ-दहा दिवसांपासून काम बंद आहे. मग पैसे कोठून मिळणार. घरात काय लागत नाही. सर्व कुटुंब याच कामातून मिळालेल्या पैशातून चालवावे लागते. कोरोनाला रोखण्यासाठी ही उपाययोजना बरोबर आहे. पण, आमच्या सारख्या कामगारांचा काय? 
राजू बंड म्हणाले, घरात तेल आहे, तर मीठ नाही. सर्व विकत घ्यावे लागते. धान्य हे सर्व कोठून आणणार. आमचा पूर्ण भागच बांधकाम कामगारांचा आहे. सर्व एकाच क्षेत्रात काम करणारे असल्यामुळे पैसाच येणे बंद झाले आहे. दिवसभर घरात बसायचं तर उन्हाचा कहर असला आहे, घरात बसायला तरी जागा नको का? पत्र्याची आमची घर, त्यात अंगाची लाहीलाही होते. 
सिद्धू कलाकार म्हणाले, काम नाही, धंदा नाही. सरकारने पहिल्यांदा धान्य मिळवून द्यावे. पैसे येणेच बंद झाले आहे. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्‍न आहे. कामावर गेले तरी मारत्यात. गर्दी केल्यावर मारणं एक ठिक आहे. गर्दी न करता काम करण्यास परवानगी द्यायला हवी. आम्हालाही जीवाची काळजी आहेच की, घरात बसायला तेवढी जागा तरी पाहिजे. असल्या उन्हात किती गरम होतंय. 

झोपडपट्टीत सर्व पत्र्याची घरे 
झोपडपट्टी भागात अपवाद वगळता सर्व घरे पत्र्याची आहेत. त्यामुळे घरात नागरिकांना बसणे आवघड झालं आहे. त्यामुळे नागरिक झाडाखाली सावलीला बसत आहेत. झोपडपट्टी भागात देखील सध्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी झाली आसून नागरिक जिथे सावली मिळेल तिथे बसत असल्याचे दिसत आहे. नाईलाज म्हणून आम्हाला असं बसावं लागत असल्याचे ते सांगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Solapur Ground Report