दोघेजण बॅंकेत गेले अन्‌ बनावट स्वाक्षरी करून तिसऱ्याच व्यक्‍तीच्या नावावरील पैसे काढू लागले पण...

Crime News in Solapur
Crime News in Solapur

सोलापूर : होटगी रोडवरील उजनी कॉलनी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून दोघांनी बनावट स्वाक्षरी करून दुसऱ्याच्या खात्यातील रक्‍कम काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हृदय आनंद नाथ (शाखा व्यवस्थापक) यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मनिषा नागेश पवार (रा. निमल नगर, एमआयडीसी रोड) आणि सचिन काळे या दोघांविरुध्द 420 चा गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, काळे याच्या सांगण्यावरून मनिषा पवार हिने शालन सदाशिव इंगळे यांच्या नावाची स्लिप पैसे काढण्यासाठी भरून दिली होती, असेही नाथ यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

गाळ्यांच्या लिलावासाठी जनहित याचिका

सोलापूर : महापालिकेच्या मिनी व मेजर गाळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्या गाळ्यांचे नव्याने लिलाव करावेत, या मागणीसाठी युवक पॅंथरचे दीपक गवळी यांनी जिल्हा न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ऍड. जयप्रकाश भंडारे याप्रकरणी कामकाज पहात आहेत. गाळ्यांचे भाडे थकल्याने महापालिकेने काही दिवसांपूर्वी सर्व गाळे सिल केले होते. त्यानंतर काहींनी थकबाकी भरली तर काहींनी अजूनही भाड्याची रक्‍कम दिलेली नाही. आता गाळ्यांचे लिलावच नव्याने करण्याच्या मागणीमुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : आंबेडकर नगर, सम्राट चौक परिसरातील सुरज ऊर्फ येडाप्पा कटरमल (वय 36) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मेंगाणे वस्ती, जुना कारंबा रोडवरील विहिरीतील पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर घटनास्थळी जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एस. आर. काळे हे पोहचले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून सर्वोपचार रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल पोलिसांत झाली आहे.

बिगारीच्या पैशावरून कामगाराला मारहाण

सोलापूर : बापूजी नगरातील सुनिल परशुराम आमाटी यांनी हरिकृष्ण रामकृष्ण म्हेत्रे व विशाल शंकर म्हेत्रे यांच्या घरी जाऊन बिगारीचे पैसे मागितले. त्यावेळी कसले पैसे, बिगारीचे पैसे देणार नाही म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाणदेखील केली, अशी फिर्याद आमाटी यांनी सदर बझार पोलिसांत दिली. तत्पूर्वी, म्हेत्रे याने बांधकामाजवळील फरशीने डोक्‍यात मारून जखमी केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार दोघांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

मास्क न घालणाऱ्यांना सव्वालाखांचा दंड

सोलापूर : शहरातील कोरोनाला आवर घालण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हाताची स्वच्छता ठेवावी असे आवाहन केले जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांनी 240 जणांकडून एक लाख 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना 14 हजारांचा तर 12 बेशिस्त वाहनचालकांकडून सहा हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com