आता पिक कर्ज देखील ऑनलाईन 

farmerbank.jpg
farmerbank.jpg

सोलापूरः लॉकडाउन काळात शेतकरी व बॅंकाची अडचण पाहता पीक कर्ज वाटप करण्यासाठी औरंगाबादचा ऑनलाइन पॅटर्न राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यावर नियोजन किंवा जिल्हा पातळीवर ऑनलाइन सेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

या वर्षी लॉकडाउनने पीक कर्ज वाटपाबाबत स्थिती गंभीर झाली आहे. बॅंका उघडण्याच्या आधीच तासन्‌तास बॅंकेसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. बॅंकांनी केवळ पैशाची देवघेव करण्याची मर्यादा घातली आहे. तरी मोठ्या रांगामुळे बॅंक यंत्रणा त्रस्त झाली आहे. बॅंकात कर्मचारी संख्या एकूण कामाच्या तुलनेत अपुरी पडते आहे. कोरोना संसर्गाचे सावट सर्व बॅंकावर पडले आहे. 

त्यातच खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पीक कर्जाची आवश्‍यकता असते. पण सद्यस्थितीत बॅंकावरचा कामाचा ताण पाहता ही कामे वेळेत पूर्ण करणे अशक्‍य बनले आहे. मंगळवेढा, पंढरपूर अशा अनेक ठिकाणी अजूनही कोरोना संसर्गाने व्यवहार ठप्प झाले आहेत. सोलापूर शहराची स्थिती अधिकच वाईट आहे. शेतकऱ्यांना बॅंकेत पोचता येणार नाही हे अगदी स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईलद्वारे पीक कर्जाची मागणी नोंदवता येईल, अशा पद्धतीची ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. औंरगाबाद जिल्ह्यात केवळ जिल्हास्तरावर हा ऑनलाइन पॅटर्न राबवला जात आहे. 
शेतकऱ्यांनी मोबाईलवर लिंक ओपन करून त्यात माहिती भरावी. तसेच त्यांच्या कागदपत्राची खात्री करून घ्यावी. नंतर बॅंक ऑनलाइन अर्जाची छाननी करून संबंधित शेतकऱ्यांना आवश्‍यकतेनुसार बोलावून घेईल. सध्या सातबारा उताऱ्याबाबत ऑनलाइन सेवा वापरावी लागणार आहे. दुय्यम निबंधकाची कार्यालये अजूनही पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. तसेच आवश्‍यक ते शपथपत्राची अडचण विचारात घेतली जात आहे. 
राज्यस्तरावरील बॅंक कमिटीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार आता जिल्हास्तरावर अशा प्रकारची ऑनलाइन सेवा देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. 
सोलापूर जिल्ह्यात यावर्षी कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची संख्या 78 हजारापर्यंत आहे. त्यापैकी 63 हजार शेतकऱ्यांची प्रत्यक्षात कर्जमाफी झाली. त्यांना पीक कर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे. मान्सूनजवळ आल्याने याबाबत येत्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. 

सुचना मिळताच कार्यवाही 
ऑनलाइन पीक कर्ज वितरणाबाबत पुढील सूचना मिळाल्यास कार्यवाही करता येणे शक्‍य आहे. 
संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com