कोरोना : बापरे! मोफत धान्यासाठी "येथे' जमली धोकादायक गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

त्या दुकानदाराने दोन किलो गहू, तांदूळ व तेल अशा वस्तूंचे पॅकिंग करून 50 लोकांची यादी बनवली. गरजवंतांच्या नावाने चिठ्ठ्या दिल्या होत्या. मग या 50 गरजवंतांना धान्य वाटप करताना परिसरातील अनेक रहिवाशांना तेथे शासनाच्या वतीने मोफत धान्य वाटप होत असल्याची माहिती मिळाल्याने गल्लीबोळातून व रस्त्यांवरून धावत-पळत 150 ते 200 नागरिकांनी "ते' किराणा दुकान गाठत होते.

सोलापूर : नीलमनगर येथील एका किराणा दुकानात मोफत धान्य वाटप होत असल्याची माहिती मिळाल्याने या परिसरातील 150 ते 200 नागरिकांनी संबंधित किराणा दुकान परिसरात गर्दी केली. "कोरोना' विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अशी गर्दी जमणे जीवघेणा ठरू शकतो, यामुळे लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तेथील गर्दी हटवली.

हेही वाचा - हाताची स्वच्छता पाळा, कोरोना टाळा...

150 ते 200 नागरिकांची गर्दी
याबाबत अधिक माहिती अशी, की विजयपूर वेस येथील एका व्यक्तीने गरिबांसाठी नीलमनगर येथे शरण मठाजवळील एका दुकानदाराला धान्य वाटप करण्यासाठी पैसे दिले होते. त्या दुकानदाराने दोन किलो गहू, तांदूळ व तेल अशा वस्तूंचे पॅकिंग करून 50 लोकांची यादी बनवली. गरजवंतांच्या नावाने चिठ्ठ्या दिल्या होत्या. मग या 50 गरजवंतांना धान्य वाटप करताना परिसरातील अनेक रहिवाशांना तेथे शासनाच्या वतीने मोफत धान्य वाटप होत असल्याची माहिती मिळाल्याने गल्लीबोळातून व रस्त्यांवरून धावत-पळत 150 ते 200 नागरिकांनी "ते' किराणा दुकान गाठत होते.

पोलिसांनी थांबवले धान्य वाटप
शरण मठ परिसरात गर्दी वाढत जात असल्याबाबत येथील नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांना फोन आला. शासनाने कालच धान्य वाटप करण्याचे जाहीर केले अन्‌ लगेच आज धान्य वाटप अन्‌ तेही किराणा दुकानातून वाटप होणार नाही, हे जाणून नगरसेवक श्री. धुत्तरगावकर यांनी पोलिसांना ही माहिती दिली व स्वत: तेथे धाव घेतली. धान्य वाटपाचा कार्यक्रम थांबवून पोलिसांनी तेथून नागरिकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर तेथील गर्दी हटली.

एवढे लोक एकत्र येऊन गर्दी जमत असल्याची माहिती मिळाल्याने आधी पोलिसांना फोन केला. कारण, या गर्दीत एखादा बाहेरगावातून आलेला रुग्ण कोरोनाबाधित असेल तर त्याचा संसर्ग येथील गरीब कामगार वस्तीतील नागरिकांना होऊ शकतो. कार्यकर्ते समजून सांगत होते, मात्र गर्दी हटत नव्हती. पोलिसांनी येऊन गर्दी हटवली. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य अजूनही कोणाला समजत नाही.
- गुरुशांत धुत्तरगावकर,
नगरसेवक, प्रभाग क्र. 19


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dangerous crowds for free grains in Solapur