esakal | चार महिने, तीन पालकमंत्री; शरद पवारांचे विश्‍वासू समजले जाणारे वळसे पाटील, आव्हाड का बदलले?
sakal

बोलून बातमी शोधा

Dattatreya Bharne to guardian minister of Solapur

सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघातील बबनराव शिंदे, मोहोळ मतदारसंघातील यशवंत माने व पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. करमाळा मतदारसंघातील संजय शिंदे हे अपक्ष निवडून आले असली तरी राष्ट्रवादीने त्यांना निवडणूकीत पाठींबा दिला होता. त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादीचेच समजले जातात. लोकसभा निवडणूकीत त्यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसच्या चिन्हावर आमदार प्रणिती शिंदे या विधानसभा निवडणूकीत निवडून आल्या आहेत.

चार महिने, तीन पालकमंत्री; शरद पवारांचे विश्‍वासू समजले जाणारे वळसे पाटील, आव्हाड का बदलले?

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता सहा महिने पूर्ण होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून रोखले. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात सोलापूरच्या एकाही नेत्याला स्थान मिळाले नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे अंत्यत विश्‍वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्या गळात सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पडली. मात्र दोनच महिन्यात त्यांची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी जबाबदारी घेऊन महिना होण्याच्या आताच आता ही जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिली आहे. यामुळे चार महिन्याच्या कालावधीत सोलापूरला तीन पालकमंत्री मिळाले आहे. यातील एकही पालकमंत्री का कायम टिकला नाही, असा प्रश्‍न यामुळे चर्चेत आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघातील बबनराव शिंदे, मोहोळ मतदारसंघातील यशवंत माने व पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. करमाळा मतदारसंघातील संजय शिंदे हे अपक्ष निवडून आले असली तरी राष्ट्रवादीने त्यांना निवडणूकीत पाठींबा दिला होता. त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादीचेच समजले जातात. लोकसभा निवडणूकीत त्यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसच्या चिन्हावर आमदार प्रणिती शिंदे या विधानसभा निवडणूकीत निवडून आल्या आहेत. अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्‌टी, माळशिरसमधून राम सातपुते तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सुभाष देशमुख, सोलापूर उत्तर मदतारसंघातून विजयकुमार देशमुख हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. बार्शी मतदारसंघातून राजेंद्र राऊत अपक्ष व सांगोला मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावरुन शहाजीबापू पाटील हे विजयी झालेले आहेत. 
निवडणूकीवेळी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेना व भाजपमध्ये गेले. त्यानंतरही अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. मात्र, अशा स्थितीतही काँग्रेस व राष्ट्रवादीने पाच जागा (संजय शिंदे यांच्यासह) मिळवल्या. निवडणूकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले असताना सुद्धा निकालानंतर अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यामध्ये कोणाला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगत असतानाच महाविकास आघाडीच्या विजयी झालेल्या सर्व आमदारांची नावे त्यांचे- त्यांचे समर्थक चर्चेत आणत होते. मात्र, कोणालाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हा पुन्हा चर्चेत आलेला विषय होता. त्यात शरद पवार यांचे विश्‍वासू समजले जाणारे वळसे पाटील यांच्याकडे पालकंमत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी पदभार घेतल्यानंतर आढावा बैठकही घेतली होती. २५ जानेवारीला ते सोलापूरात होते. २६ ला त्यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर मार्चमध्ये महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्याजागी मार्चमध्ये जितेंद्र आव्हाड यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. आव्हाड यांनी नियुक्ती झाल्याबरोबर दोनच दिवसात सोलापूर गाठले होते. २ एप्रिलला ते सोलापुरात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. अनेक सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले होते, अशी चर्चा होती. दरम्यान त्यांनी ‘मला माफ करा... मी हरलो...’ अशी फेसबुकवर भावनिक पोस्ट केली होती. शरद पवार यांनीही फोन करुन चौकशी केल्याची माहिती आव्हाड यांनी फेसबुकवरुन दिली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी दत्तात्रय भरणे यांची सोलापुरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. एकूणच चार महिन्यात तीन पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत.