सारथीचे उपक्रम व योजना बंद करणे थांबवा : कोण म्हणाले वाचा 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

सारथी फेलोशिप, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सारथी तारादूत प्रकल्पासह सारथीमध्ये जवळपास 80 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एवढ्यावर समाधान न झाल्याने महाविकास आघाडी सरकारने मराठा संशोधक, विद्यार्थी, शेतकरी महिला यांचे सर्व उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. सारथी संस्थेची दुरवस्था थांबवा, सारथी बंद पडू देऊ नका, अशी मागणी शिवरत्नचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील यांनी केली आहे. 

अकलूज (सोलापूर) : मराठा समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करणारी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्था बंद करू नका, अशी मागणी शिवरत्नचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील यांनी केली. 

हेही वाचा : कोरोनाला न जुमानता "येथे' आले कोसो दूरहून मेंढरांचे कळप 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) निर्मिती मराठा समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्टीने विकास व्हावा या उद्देशाने झाली आहे. याबाबत धैर्यशील मोहिते- पाटील पुढे म्हणाले, धोरणात्मक व दर्जात्मक गुणवत्ता सांभाळता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने या संस्थेला स्वायत्त दर्जा दिला होता. सारथीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी यासह रिसर्च फेलोशिप, आयबीपीएस कोचिंग, तारदूत प्रकल्प सुरू झाले होते. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मासिक शिष्यवृत्ती मिळत असल्याने विद्यार्थी दिल्लीला जाऊन यूपीएससीसाठी अभ्यास करत होते. परंतु, आता संस्थेचा तारदूत प्रकल्प आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. सारथीतील मनुष्यबळही कमी केले असून आता फक्त 12 कर्मचारी ठेवले आहेत. सारथीतील कर्मचारी संख्या कमी करणे, तारदूत प्रकल्प व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे आदी प्रकार संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करणारे आहेत. सारथीच्या स्वायत्तेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असल्याचे मोहिते- पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा : कोरोनासोबत एकटा नव्हे तर कुटुंबीयांसह लढतोय डॉक्‍टर! 

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करणे, शेतकऱ्यांना नवीन पिकांसाठी, आधुनिक शेतीसाठी मोफत प्रशिक्षण देणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार होते. आता हे उपक्रम चालू होतील की नाही, याबाबत शंका आहे. सारथी फेलोशिप, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सारथी तारादूत प्रकल्पासह सारथीमध्ये जवळपास 80 टक्के कर्मचारी कपात केली आहे. एवढ्यावर समाधान न झाल्याने महाविकास आघाडी सरकारने मराठा संशोधक, विद्यार्थी, शेतकरी महिला यांचे सर्व उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. सारथी संस्थेची दुरवस्था थांबवा, सारथी बंद पडू देऊ नका, अशी मागणी श्री. मोहिते- पाटील यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for non closure of Sarathis activities and schemes