स्वामी समर्थ कारखाना व बॅंकेबाबत काय केली मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्‍यात असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना व स्वामी समर्थ सहकारी बॅंक गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. या दोन्ही संस्था शेतकरी व सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या सुरू करण्याची मागणी अक्कलकोट तालुक्‍यातील नेत्यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. याबाबत ते पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदनही देणार आहेत. 

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्‍यात असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना व स्वामी समर्थ सहकारी बॅंक गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. या दोन्ही संस्था शेतकरी व सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या सुरू करण्याची मागणी अक्कलकोट तालुक्‍यातील नेत्यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. याबाबत ते पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदनही देणार आहेत. 

हेही वाचा ः सर्वसामान्यांची सरपंच होण्याची संधी हुकणार 

अक्कलकोटचे प्रसिद्ध दैवत असलेल्या स्वामी समर्थांच्या नावे या दोन्ही सहकारी संस्था सुरू केल्या होत्या. मात्र, त्या दोन्ही संस्थांची सध्याची स्थिती अतिशय बिकट आहे. बॅंकेचे 14 कोटी रुपये येणे आहेत तर 12 कोटी रुपये बॅंक देणे लागते. 2012 पासून बॅंकेवर अवसायक आहेत. ते अवसायक उठवून बॅंकेला पुन्हा पहिले वैभव प्राप्त करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे दिलीप सिद्धे यांनी सांगितले. बॅंकेत राजकारण शिरल्यामुळे बॅंकेची स्थिती वाईट झाल्याचेही त्यांनी सांगितले. बॅंकेच्या अनेक संचालक मंडळांकडे मोठी थकबाकी आहे. ती त्यांनी भरल्यास बॅंकेला पुन्हा पहिले दिवस येतील असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा ः वळसे-पाटलांचे देवदर्शन अन्‌ कार्यकर्त्यांसोबत बैठक 

शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाविलाजाने खासगी कारखान्यांना ऊस घालावा लागत आहे. या कारखान्यावरही अवसायकाची नेमणूक केली आहे. सात नोव्हेंबर 2017 ला कारखान्याची वार्षिक सभा झाल्यानंतर 2018-19 हा गळीत हंगाम चालू करण्याचा ठरावही झाला होता. मात्र, कारखाना चालू केला नसल्याचे माजी संचालक मल्लाप्पा नेरुळे यांनी सांगितले. कारखान्यात झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे कारखान्याची ही स्थिती निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कारखान्याकडे सध्या 105 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखान्याची परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री वळसे-पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून पुढील गाळप हंगामावेळी कारखाना चालू करण्याचे निर्देश शासनाला देण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारखाना चालू करून अक्कलकोट तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.कारखान्यावर नेमण्यात आलेल्या अवसायकांनी अद्यापही कारखान्याचा पदभार घेतला नाही. त्यामुळे सध्या कारखान्याला कोणीच वाली नसल्याने याबाबत आपण पुढाकार घेऊन कारखाना चालू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे बाळासाहेब मोरे यांनी सांगितले. त्याचबरोबर उजनीचे पाणी कुरनूर धरणात सोडण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी महिबूब मुल्ला, अविनाश कांबळे, सुनील बंडगर, योगेश पवार, सिद्धू साखरे, महादेव वाले उपस्थित होते. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Swami Sambhar Factories & Banks