स्व. राजूबापू यांच्याप्रमाणेच गणेश पाटील यांच्याकडेही लक्ष देऊ : अजित पवार 

सुनील कोरके 
Saturday, 17 October 2020

राजूबापू पाटील हे अतिशय विश्वासू व निष्ठावान सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे तसेच पाटील कुटुंबीयांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र गणेश पाटील यांच्यावर आमचे पूर्ण लक्ष राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

भोसे (क) (सोलापूर) : राजूबापू पाटील हे अतिशय विश्वासू व निष्ठावान सहकारी होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे तसेच पाटील कुटुंबीयांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र गणेश पाटील यांच्यावर आमचे पूर्ण लक्ष राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष (कै.) राजूबापू पाटील, त्यांचे बंधू महेश पाटील व चुलते प्रा. डॉ. अनंत पाटील या तिघांचे पंधरा दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे निधन झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. 17) पंढरपूर तालुक्‍याच्या पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी भोसे (ता. पंढरपूर) येथे येऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत आमदार भारत भालके, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन ढोले उपस्थित होते. 

श्री. पवार यांनी भोसे येथील राजूबापू पाटील यांच्या निवासस्थानी राजूबापू यांचे पुत्र उपसरपंच गणेश पाटील, बंधू शेखर पाटील व चुलते भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या वेळी त्यांनी पाटील परिवारातील सर्व कुटुंबीयांची चौकशी करून कृषिराज शुगर कारखान्याच्या प्रगतीची माहिती घेतली व राजूबापू यांच्याप्रमाणेच आता गणेश पाटील यांच्याकडेही आम्ही लक्ष देऊ, अशी ग्वाही दिली. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, करकंबचे सरपंच आदिनाथ देशमुख, आशिष पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar meet to Rajubapu Patil's family