esakal | "पोटनिवडणुकीनंतर महाविकास सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन नाही तोडले, तर माझं नाव बदला !'

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

मोगलाई मोगलांच्या काळात होती, परंतु आता लोकशाहीतही वीजबिल वसुलीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून मोगलाई सुरू असून, शेतकऱ्यांचं वीज कनेक्‍शन तोडले जात आहेत. उद्या पोटनिवडणूक झाल्यानंतर या सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्‍शन नाही तोडले, तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

"पोटनिवडणुकीनंतर महाविकास सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन नाही तोडले, तर माझं नाव बदला !'
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : मोगलाई मोगलांच्या काळात होती, परंतु आता लोकशाहीतही वीजबिल वसुलीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून मोगलाई सुरू असून, शेतकऱ्यांचं वीज कनेक्‍शन तोडले जात आहेत. उद्या पोटनिवडणूक झाल्यानंतर या सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्‍शन नाही तोडले, तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस नंदेश्वर येथे बोलत होते. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राम शिंदे, आमदार सुभाष देशमुख, बाळा भेगडे, धैर्यशील मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोत, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, संचालक सचिन शिवशरण, माजी सभापती प्रदीप खांडेकर, बापू मेटकरी आदींसह व्यासपीठावर भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

फडणवीस पुढे म्हणाले, लोकहितवादी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार होते. परंतु आता हे सरकार महावसुली आघाडी सरकार झाले आहे, त्यामुळे पोलिस, सामान्य माणसांकडून वसुली केली जात आहे. एक मंत्री शंभर कोटी मागताहेत, त्यांची वसुली सावकारी पद्धतीने सुरू आहे. अतिवृष्टीच्या काळात आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. हेच मुख्यमंत्री बांधावर जाऊन 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत द्या, असे सांगत होते. परंतु त्यांनी दहा हजार हेक्‍टरी देखील मदत दिली नाही. पाच वर्षात आम्ही एकाही शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडले नाही, या सरकारने दुप्पट बिल देऊन वसुली केली. या काळात परिस्थिती खराब झाली म्हणून मुंबईच्या व्यापाऱ्यांचे 5000 कोटी विकास शुल्क माफ करण्यात आले. 

35 गावचा पाणी प्रश्न आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार, दिवंगत आमदार भारत भालके त्यावेळी सदस्य होते. मग का निधी दिला नाही? समाधान आवताडे यांना तुम्ही विजयी करा, या सरकारने निधी नाही दिला तर थेट मोदी सरकारकडून पैसे आणून साडेतीन वर्षात ही योजना मार्गी लावू. म्हैसाळ योजनेसाठी मोदी सरकारने तरतूद केल्यामुळे या भागातील हजारो हेक्‍टर क्षेत्र पाण्याखाली आले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन वीज स्थगितीचा आदेश दिला. परंतु अधिवेशन संपताच वसुलीबाबत त्यांनी पुन्हा आदेश दिले. लबाड लोकांच्या लबाडीला बळी पडू नका, असे आवाहन करीत, आहे ते आरक्षण देखील या सरकारने टिकवले नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी बोलताना केला. 

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, अनैसर्गिक सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश आहे. त्या विरोधातील ही लढाई आहे. ही निवडणूक राज्याची दशा आणि दिशा दाखवणारे आहे. आमदार पडळकर बारामतीत फिरले नाहीत त्यापेक्षा जास्त मंगळवेढ्यात फिरले. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार आहे. 35 गावच्या पाणीप्रश्नी प्रत्येक निवडणुकीत वेगळा कागद दाखवून या मतदारांची दिशाभूल केली. 

उमेदवार समाधान आवताडे म्हणाले, आजपर्यंत विकासाच्या मुद्द्यावर बोललो, परंतु विरोधकांकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. दामाजी कारखान्याचे 19500 सभासदांचे सभासदत्व रद्द होणार नाही, हा शब्द मी विरोधी पक्षनेत्यांसमोर देत आहे. अर्थसंकल्पामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद न करता बारामती उपसा सिंचन योजनेची तरतूद या सरकारने केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल