तुमच्या गटात प्रवेश करतो, तुम्ही "आदिनाथ'साठी आम्हाला मदत करा; "या' संचालकांनी घातले "या' आमदारांना साकडे !

अण्णा काळे 
Sunday, 9 August 2020

आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, आम्ही सध्या माजी आमदार नारायण पाटील गटात आहोत. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट घेण्यापूर्वी आमची माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर देखील बैठक झाली होती. याही बैठकीला 10 संचालक उपस्थित होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार पाटील यांची देखील आहे. त्यामुळे जो कोणी साखर कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहण्याची भूमिका सर्वानुमते घेतलेली आहे. 

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडलेला असताना, हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बागल गट प्रयत्न करत नाही. त्यामुळे कारखान्याच्या बारा संचालकांनी आमदार संजय शिंदे यांची निमगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे कारखाना सुरू करण्यासंदर्भात साकडे घातले. ही भेट मागील आठवड्यात अगदी सकाळी सहाच्या सुमारास झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात तरी कारखाना सुरू होणार की नाही, या हालचालींकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : म्हेत्रेंचा प्रस्ताव झिडकारला, प्रणितींचा गुपित ठेवला; प्रदेशाध्यक्ष थोरात, मंत्री ठाकूर यांच्या दौऱ्यात राजकीय गमतीजमती!  

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. कारखाना सुरू करण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे देखील प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याविषयी चर्चा झाली आहे. मात्र कारखाना चालू करण्यासाठी कोणताच प्रयत्न होत नसल्याने या संचालकांनी आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीत कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका या संचालकांनी धरली आहे. 

हेही वाचा : कॉंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये फिरलेले जयवंतराव जगताप आता राष्ट्रवादीच्या प्रेमात ! 

यंदाच्या हंगामात "आदिनाथ' सुरू होणे अवघड 
याविषयी आमदार संजय शिंदे म्हणाले, आदिनाथ कारखान्याचे बारा संचालक माझ्याकडे आले होते. त्यांनी आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. उपस्थित सर्व संचालकांसमक्ष मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला व आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याबरोबर संचालकांसह बैठक देखील झाली. आदिनाथ सुरू व्हावा यासाठी माझाही प्रयत्न आहे. मात्र कारखाना सुरू करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे या हंगामात कारखाना सुरू होणे अवघड दिसते आहे. 

जो कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहू 
आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील म्हणाले, आम्ही सध्या माजी आमदार नारायण पाटील गटात आहोत. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आमदार संजय शिंदे यांची भेट घेतली आहे. ही भेट घेण्यापूर्वी आमची माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर देखील बैठक झाली होती. याही बैठकीला 10 संचालक उपस्थित होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार पाटील यांची देखील आहे. त्यामुळे जो कोणी साखर कारखाना सुरू करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहण्याची भूमिका सर्वानुमते घेतलेली आहे. 

"तुमच्या गटात प्रवेश करतो, तुम्ही आम्हाला मदत करा' 
आमदार शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बारा संचालकांनी बागल गट कारखाना व्यवस्थित चालवत नाहीत, चालू गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने बागल यांच्याकडून कुठल्याही हालचाली होत नाहीत, आम्ही रश्‍मी बागल यांचा सह्यांचा अधिकार काढतो व तुमच्या गटात प्रवेश करतो; पण तुम्ही आम्हाला मदत करा, अशी मागणी उपस्थित संचालकांनी केली. यावर आमदार संजय शिंद यांनी, आपण अडचणीतून मार्ग काढू, पण आहे तिथेच थांबा, असे सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Director met MLA Sanjay Shinde to start Adinath Sugar factory