म्हेत्रेंचा प्रस्ताव झिडकारला, प्रणितींचा गुपित ठेवला; प्रदेशाध्यक्ष थोरात, मंत्री ठाकूर यांच्या दौऱ्यात राजकीय गमतीजमती! 

प्रमोद बोडके 
Sunday, 9 August 2020

जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी म्हेत्रे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीचा प्रस्ताव मांडला आणि तिथून पुढे जवळपास सर्वच वक्‍त्यांनी म्हेत्रे यांच्या आमदारकीचा मुद्दा लावून धरला. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याही लक्षात ही बाब आली. म्हेत्रे यांच्या आमदारकीचा मुद्दा सोडून तुम्ही दुसरा विषय मांडा, असे सांगण्याची वेळ प्रदेशाध्यक्षांवर आल्याने म्हेत्रे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव तूर्तास तरी झिडकारल्याचे जाणवले. शहर कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना थेट सोलापूरचे पालकमंत्री करा, अशीच मागणी लावून धरली. या मागणीवर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी स्मितहास्य करत "बघू' एवढेच उत्तर दिले आणि या प्रश्नाचे गुपित शेवटपर्यंत कायम ठेवले. 

सोलापूर : अक्कलकोटमधून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा आणि सोलापूर शहर मध्यमधून तिसऱ्यांदा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूरचे पालकमंत्री करा, अशा दोन राजकीय मागण्या आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्या. राज्याच्या सत्तेत आल्यापासून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश कार्याध्यक्ष तथा महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आज पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाचे प्रमुख सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत म्हटल्यावर सोलापुरातील नेत्यांच्या समर्थकांनी प्रदेशच्या नेत्यांसमोर आपल्या नेत्यांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा : कॉंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये फिरलेले जयवंतराव जगताप आता राष्ट्रवादीच्या प्रेमात! 

माजी मंत्री म्हेत्रे विधानसभा निवडणुकीत डगमगले. (भाजपच्या वाटेवर होते, उमेदवारी मिळाली नाही म्हणून कॉंग्रेसमध्येच थांबले.) पराभूत झाल्याची आठवण मंत्री ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना भर बैठकीत करून दिली. काही क्षणातच त्यांनी राजकीय कोरोनाचे उदाहरण देत, कोरोनामध्ये घाबरल्यास माणूस हरतो, असे सांगत, म्हेत्रे यांनी 2019 च्या निवडणुकीत ठाम राहावे, घाबरू नये असा सल्ला दिल्याचेही सांगितले. या निवडणुकीत म्हेत्रे पराभवाला घाबरले म्हणून डगमगले आणि पराभूत झाल्याचे मंत्री ठाकूर यांनी सांगितले. 

हेही वाचा : कोरोनाची लस कधी येणार..? महसूलमंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येइना मग मी कसं सांगू? 

जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी म्हेत्रे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीचा प्रस्ताव मांडला आणि तिथून पुढे जवळपास सर्वच वक्‍त्यांनी म्हेत्रे यांच्या आमदारकीचा मुद्दा लावून धरला. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याही लक्षात ही बाब आली. म्हेत्रे यांच्या आमदारकीचा मुद्दा सोडून तुम्ही दुसरा विषय मांडा, असे सांगण्याची वेळ प्रदेशाध्यक्षांवर आल्याने म्हेत्रे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव तूर्तास तरी झिडकारल्याचे जाणवले. शहर कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना थेट सोलापूरचे पालकमंत्री करा, अशीच मागणी लावून धरली. या मागणीवर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी स्मितहास्य करत "बघू' एवढेच उत्तर दिले आणि या प्रश्नाचे गुपित शेवटपर्यंत कायम ठेवले. 

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री थोरात आणि मंत्री ठाकूर आज सोलापूरला आले. कोरोनाच्या दौऱ्यात पक्ष संघटनेचीही बैठक दोन्ही मंत्र्यांनी घेतली. नावापुरती जिल्हा कॉंग्रेसची असलेली बैठक माजी मंत्री म्हेत्रे यांच्या समर्थकांनी फुलून गेली होती. सोलापूर शहर मध्यमधून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत जाणाऱ्या प्रणिती शिंदे यांना यंदाही मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी थेट त्यांना सोलापूरचे पालकमंत्री करण्याची मागणी केली. पालकमंत्री होण्यापूर्वी मंत्रिमंडळात असणे आवश्‍यक असतानाही कार्यकर्त्यांनी भन्नाट मागणी लावून धरली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आत्मविश्वास हरवलेल्या आणि थकलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अचानक राज्यातील सत्तेची संधी मिळाली. आपण सत्तेत आहोत याचा अल्पसा अनुभव आज मंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आला. 

मंत्र्यांचा सल्ला : धुडगूस घाला 
ग्रामीणच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. अधिकारी आमचं ऐकत नाहीत, फोन उचलत नाहीत असे सांगत असतानाच मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. प्रत्येक गोष्ट आम्ही बघायची म्हटल्यावर मग तुम्ही काय करता, असा प्रश्न विचारत, तुमचा तालुका तुम्ही सांभाळा. दंगा करा, भीक मागू नका, आपले अधिकार हिसकावून घ्या, आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्याला प्रदेशाध्यक्ष थोरात यांनीही सहमती दर्शवत शासकीय कार्यालयात जाताना चार चांगल्या धडधाकट व्यक्तींना सोबत घेऊन जाण्याचाही मार्ग त्यांनी दाखवला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political fun during the visit of State President Thorat and Minister Thakur