esakal | मोठी बातमी ! रेल्वेकडून सवलतीचा प्रवास बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

indian railway
  • ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिकांसह 40 जणांना नाही प्रवास सवलत 
  • विद्यार्थी, रुग्ण अन्‌ दिव्यांग व्यक्‍तींसाठीच रेल्वेतून सवलतीचा प्रवास 
  • जनता कर्फ्यूमुळे रविवारी राज्यातील लालपरीची सेवा राहणार बंद 
  • हैदराबाद-मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-पुणे-हैदराबाद, नांदेड-पुणे-नांदेड एक्‍स्प्रेसही बंद 

मोठी बातमी ! रेल्वेकडून सवलतीचा प्रवास बंद 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : देशातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंत 40 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आता दिव्यांग प्रवासी, रुग्ण आणि विद्यार्थी वगळता अन्य प्रवाशांचा सवलतीचा प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती, स्वातंत्र्य सैनिक, युथ, शेतकरी, कलाकार, राष्ट्रीय खेळाडू, डॉक्‍टर्स, मासिक पासधारक आणि सहल, सभा व कार्यशाळांसाठी जाणाऱ्या व्यक्‍तींचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवासी नसल्याने रविवारी (ता. 22) लालपरीची सेवा बंद ठेवली जाणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : जागे व्हा ! तापमानवाढीचा अन्‌ कोरोनाचा काहीच नाही संबंध 


कोरोनाचा प्रसार वाढू नये या हेतूने आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचारी, पंतप्रधानांकडून पुरस्कारप्राप्त उद्योजक, शिक्षक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती, स्वातंत्र सैनिक, शैक्षणिक सहली, राष्ट्रीय कार्यशाळा, सभा, मानव उत्थान सेवा समिती, राष्ट्रीय युथ प्रोजेक्‍ट, भारत स्क्‍वॉट गाईडस्‌, शेतकरी आणि दूध उत्पादक, भारत कृषक समाज, सर्वोदय समाज, वर्धा, कलाकार, राष्ट्रीय खेळाडू, डॉक्‍टर्स, नर्स, भारत सेवा दल, बेंगलोर यासह अन्य संस्था व व्यक्‍तींचा सवलतीचा प्रवास रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. 20) रेल्वे मंत्रालयाने हैदराबाद- मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-पुणे-हैदराबाद आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. 

हेही नक्‍की वाचा : गुढीपाडव्याला खरेदी केलेल्या वाहनांची पासिंग लांबणीवर

ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र सैनिक, कलाकार, खेळाडूंचा सवलतीचा प्रवास बंद 
देशातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विद्यार्थी, दिव्यांग प्रवासी व रुग्ण वगळता अन्य प्रवाशांचा सवलतीचा प्रवास बंद केला आहे. रविवारी (ता. 22) जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असून त्यादिवशी रद्द केलेल्या एक्‍स्प्रेस रेल्वे वगळता अन्य गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 


हेही नक्‍की वाचा : सोलापुरात जमावबंदीची कठोर अंमलबजावणी : पोलिस आयुक्‍त 


राज्यातील लालपरी रविवारी राहणार बंद 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 22) देशभर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासीच नसतील तर एसटी बस कशा चालणार, असा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासमोर उपस्थित झाला. या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्‍यक कामांसाठी ज्या ठिकाणी समाधानकारक प्रवासी असतील ते मार्ग वगळता अन्य मार्गांवरील बससेवा बंद राहील, असे महामंडळाचे परिवहन व्यवस्थापक राहूल तोरो यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.