esakal | शरद पवारांनी आपल्या विश्‍वासूला सोलापुरात का आणले? 
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion on Jitendra Awhads selection as Guardian Minister of Solapur

दिलीप वळसे-पाटील हे देखील शरद पवार यांचे विश्‍वासू होते. तरी त्यांची उचलबागंडी का केली आणि आव्हाड यांची नियुक्ती का केली, याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून कमकुवत होत असलेली राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांची मदत होईल का, हा प्रश्‍न आहे.

शरद पवारांनी आपल्या विश्‍वासूला सोलापुरात का आणले? 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवाने जग धास्तावलेले आहे. त्याला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांत असून काही दिवसांपासून त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. अशातच चार दिवसांपूर्वी सोलापुरात आणखी एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, अचानकपणे पालकमंत्रिपदावरून दिलीप वळसे-पाटील यांची उचलबांगडी. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी सोलापूर दौरा केला. कोरोना पार्श्‍वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. शरद पवार यांचे अंत्यत विश्‍वासू अशी आव्हाड यांची ओळख आहे.

सोलापुरात आले तेव्हा शरद पवार यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप वळसे-पाटील हे देखील शरद पवार यांचे विश्‍वासू होते. तरी त्यांची उचलबागंडी का केली आणि आव्हाड यांची नियुक्ती का केली, याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून कमकुवत होत असलेली राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांची मदत होईल का, हा प्रश्‍न आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीत दोन गट आहेत. एक गट शरद पवार यांना मानतो तर दुसरा गट अजित पवार यांना. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंडळी कायम शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करते. तर तरुण कार्यकर्ते शरद पवार यांना मानतात, मात्र अजित पवारांशी त्यांची जवळीक आहे. यामुळे आव्हाड यांचा जिल्ह्याला किती उपयोग होईल हा चर्चेचा विषय असून त्यांची पालकमंत्री म्हणून का नियुक्ती झाली हा प्रश्‍न आहे. 

हेही वाचा : नवीन पालकमंत्री ऍक्‍शन मूडमध्ये (व्हिडीओ) 
राष्ट्रवादीला कोणी नेता मिळाला नाही 

सोलापूर "सकाळ'चे मुख्य उपसंपादक राजाराम कानतोडे यांच्या मते "दिलीप वळसे-पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवलेले नाही. तर त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्याला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. इतक्‍या पडझडीच्या काळातही राष्ट्रवादीचे तीन आमदार पक्षाच्या चिन्ह्यावर व एक पुरस्कृत असे चार आमदार या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. असे असले तरी जिल्ह्याला नेतृत्व नाही. मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर निष्ठावंत म्हणून राष्ट्रवादीला कोणी नेता मिळाला नाही. आमदार बबनराव शिंदे हे ही जागा भरून काढू शकले असते, पण विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपत जाण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाचा विश्‍वास गमवला. सहाजिकच अशा कालखंडात पक्षाची वाढ करणारा विश्‍वासू नेता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला या ठिकाणी हवा असणार. सहाजिक ही जागा आव्हाड उत्तमरीत्या भरून काढू शकतात. खंबीर वैचारिक बैठक असलेला आणि बहुजनांचं नेतृत्त्व करणारा उमदा चेहर असा जितेंद्र आव्हाड यांना मानणारा महाराष्ट्रात एक वर्ग आहे. सोलापूर हे बहुभाषिक, बहुसंस्कृतिक, बहुआयामी शहर आहे. अशा ठिकाणी आव्हाड यांना नेतृत्व करण्याची संधी देणे यात वेगळेपण काही नाही. सोलापुरात मुस्लिम समाज मोठा आहे. आव्हाड ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात तिथेही मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.' 

हेही वाचा : देशाला इतकेही मुर्खात काढू नका; मोदींनी केलेल्या आवाहनावर आव्हाड संतापले 
हा सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केल्यासारखेच
 
"सकाळ'चे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांच्या मते, "पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा गड मानला जाणारे काही जिल्हे आहेत. त्यात सर्वात अग्रभागी सोलापूर असायचे. परंतु, मधल्या काही राजकीय साठमारीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना विरोधकांनी आपल्या जाळ्यात ओढले. याचा परिणाम राष्ट्रवादी शहर व जिल्ह्यात कमकुवत होण्यात झाला. त्यामुळे या जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एखादा आक्रमक चेहरा पक्षाला हवा होता. त्यातही तो डायनॅमिक हवा, बहुजन असावा, आक्रमक असावा, तरुण असावा, पक्षवृद्धीसाठी धडपड करणारा असावा असा विचार करून ज्येष्ठ नेते व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालक मंत्रिपदी निवड केली असावी. तसे पाहिले तर हा सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केल्यासारखेच आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यात ऑलरेडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. ते सिनिअर आहेत. तरीही त्यांना डावलून अन्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोलापूरच्या पालक मंत्रिपदी विराजमान करण्यात आला आहे. असे असले तरी सत्तेच्या साठमारीत काहीही चालते. त्यानुसार आव्हाड यांची वर्णी लागली आहे. आव्हाड यांचा सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून कितपत फायदा होईल हे कळायला वेळ लागेल, परंतु पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसला याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा तरुणाईला पक्षाशी जोडून घेण्यात आव्हाडांना यश येईल असे दिसते. तसेच काहीकाळ दुरावलेला बहुजन समाजही पक्षाशी पुन्हा एकदा जोडू घेण्यात आव्हाड यशस्वी होतील असा सध्याचा व्होरा आहे. याची सुरवात शुक्रवारी आव्हाड यांनी तीर्थक्षेत्र पंढरपुरात संत चोखामेळांच्या समाधी दर्शनाने केली आहे, असे मानायला हरकत नाही. एकूणच तरुणाई, बहुजन समाज यांना जोडून घेण्यासाठी, आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडण्यासाठी, पक्षाच्या यशाची चढती कमान ठेवण्यासाठी आव्हाड यांना पालक मंत्रिपदी नियुक्त केले गेले असावे. 

भाजपच्या पाटील यांना पवारांकडून अप्रत्यक्षरीत्या हे उत्तर 
पत्रकार प्रमोद बोडके यांच्या मते, "मंत्रिमंडळातील धडाकेबाज युवा व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. कॅबिनेट मंत्रिपद असूनही त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालक मंत्रिपद नव्हते. कामगारमंत्री यांच्या प्रकृती अस्वस्थतेने सोलापूरच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी आव्हाड यांच्यावर सोपवली आहे. दुसरी शक्‍यता सोलापूरच्या पालकमंत्रिपदासाठी कोणी उत्सुक आणि उपलब्ध नसल्याने आव्हाड यांना तात्पुरती संधी दिल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील सोलापुरात आले होते. "सोलापूरचा रंग भगवा असून हा रंग या शहराची ओळख असल्याचे वक्तव्य त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते. बहुजन चळवळीतील आक्रमक नेतृत्व व धार्मिक राजकाराणावर सदैव तुटून पडणारा कार्यकर्ता अशी आव्हाड यांची ओळख आहे. आव्हाडांच्या या नियुक्तीतून भाजपच्या पाटील यांना पवारांनी अप्रत्यक्षरीत्या हे उत्तर दिल्याचे मानले जात आहे.' 

पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत 
पत्रकार तात्या लांडगे यांच्या मते, "कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रशासनावर पकड मजबूत राहिली. मात्र, तीन चाकांवरचे सरकार कधीही पडू शकते, असे भाकीत भाजपने केले होते. हे भाकीत भविष्यात खरे ठरू नये यासाठी सोलापूर शहर, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची गरज आहे. मात्र, वळसे-पाटील यांच्याकडे पालक मंत्रिपदाची धुरा दिल्यानंतर पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. दुसरीकडे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्यासह पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांना त्यांनी चार हात लांबच ठेवले. त्यामुळे पालकमंत्री आपले असूनही भेटायला वेळ देत नाहीत. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेली कामेही होत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे पक्षप्रमुख शरद पवार यांचे निकटवर्तीय असले तरीही पदाधिकाऱ्यांची नाराजी ओळखून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आव्हाड यांचा प्रशासन आणि पक्षातील पदाधिकारी यांची सांगड घालून नागरिकांची व कार्यकर्त्यांची कामे करून घेण्यात हातखंडा आहे. त्याचा फायदा पक्षाला होईल.' 

go to top