आरोग्यदायी रानभाज्याचे महत्व तुम्हाला माहित आहे काय?

ranbhaji.jpg
ranbhaji.jpg


सोलापूर : जंगलांमध्ये, माळरानावर किंवा आपल्या परसदारीसुद्धा रानभाज्या उगवतात. रानभाज्यांमधील काही औषधी गुणधर्म समजून घेतल्यास आरोग्याची काळजीही घेता येते.

या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. भाज्या उकडून घेतल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाहीत. भाज्यांमध्ये शक्‍यतो कमी मसाले वा तेलाचा वापर कमी केल्यास त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात. या ऋतूमध्ये रानभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला दीर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात. 


आरोग्यदायी रानभाज्या 
काही भाज्या थंड, तर काही उष्णधर्मी असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी, मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. शेवळं म्हणजे पांढऱ्या मशरुम्सचाच एक महत्त्वाचा प्रकार. यात सेक्रोमायसिस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यांमध्येही या इस्टचा नैसर्गिक थर असतो. सेक्रोमायसिसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होणे, खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळेही विकत घ्यायला हवीत. त्यामुळे खवखवीसारखी लक्षणे नष्ट होतात. या भाज्यांमध्ये लोह, खनिजांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत घ्यायला हवा. 

औषधी गुणधर्म 

पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो, त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्याही उकडून शिजवल्या जातात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुर्ननर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅल्शिअम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरूपात असते. यात प्रोटिन्सही भरपूर असतात. टाकळ्याची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला "तखटा' असेही म्हणतात. शेवळा खाजरा असतो म्हणून त्यासोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालून भाजी करतात. शेवळाचा कंद अनेक औषधांमध्ये वापरला जातो. रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. बाफळी हे बी असते आणि कुळीथासारखे चपटे असते. ही भाजी चिरून उकडून, त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवली जाते. या भाजीच्या फळांचे तेलही काढतात. पोटदुखी, जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात. हेळू ही रानभाजी औषधी असते, त्याची पाने कुडाच्या पानापेक्षा लहान असतात. या भाजीला पेरूच्या आकाराची फळेही येतात. या फळांची भाजी केळ्याच्या चवीची लागते. कडमडवेली पांढऱ्या रंगाच्या या वेलीला कोवळे अंकुर येतात. याची पाने जाड असतात. ही भाजी चिंचेपेक्षाही आंबट असते. अधिक प्रमाणात लसूण वापरून ती बनवली जाते. या भाजीत पोटाचे आजार बरे करण्याची क्षमता आहे. या भाजीतील गुणधर्मामुळे कफप्रवृत्तीही दूर होते. 
आघाडा या भाजीमध्ये "अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; ही भाजी "पाचक' असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो. या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्या आणि खायला रुचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने या रानभाज्या आरोग्यासही चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्याबरोबर येणारा हा रानमेवा चुकवू नका. 

रानभाज्याचे महत्व अगदीच मोलाचे 
रानभाज्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, सुक्ष्ममुलद्रव्ये भरपूर असतात. अनेक आजारावर त्या उपयुक्त ठरतात. मधुमेहासारख्या अनेक आजारांच्या रुग्णांना त्या पुरक आहार म्हणून उपयोगी ठरतात. नैसर्गिक वाढलेल्या रानभाज्यांना विशेष चव देखील असते.

- वेदीका डोंगरकर, आहारतज्ञ सोलापूर.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com