करटोली भाजीला शक्तीशाली भाजी का म्हणतात हे आपणास माहित आहे काय? 

kartoli.jpg
kartoli.jpg

सोलापूरः करटोली ही रानभाजी जुन महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होते. उत्तम पोषण व औषधी मुल्य असलेया रानभाजीला मोठी मागणी असते त्याप्रमाणे त्याची निर्यात देखील आता होत आहे. या आगळ्या रानभाजीला महाराष्ट्र नव्हे तर परराज्यात देखील मोठी मागणी असते. 

करटोली या रानभाजीचे शास्त्रीय नाव Momordica dioica नाव असे आहे. ही एक पावसाळ्यात मिळणारी फळभाजी आहे. ही भाजी दिसते कारल्यासारखी आणि कडूही असते. 

करटोली या वनस्पतीला कारटोली,कंटोली, रानकारली, कर्कोटकी, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. 
करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून औषधात वापरतात. करटोलीच्या भाजीच्या सेवनामुळे अनेक आजारांना दूर ठेवले जाते त्यामूळे या भाजीला एक शक्तीशाली भाजी म्हणतात. या भाजीची निर्यात मोठया प्रमाणात होते. या झाडाचे खोड नाजूक व आधाराने वर चढणारे असते. पाने साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती व त्याच्या कडा दातेरी असतात. फुले पिवळी, नियमित, एकलिंगी असतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. 
फळावर लंबगोलाकार व फळांवर काट्यांचे आवरण असते. तसेच फळाता बिया अनेक असतात. या बिया तांबड्या गरात लगडलेल्या असतात. करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. कंद लंबगोलाकार, पिवळट-पांढरे असून, त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची रुची तुरट असते. 
या भाजीमध्ये मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांच्या बरोबरीने प्रथिने असतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँटीऑक्‍सिडंन्ट्‌स देखील असतात. 
करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस डोक्‍याला चोळतात. कंदाचे चूर्ण मधुमेहात खायला देतात. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत होणारा रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहेत. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. 
पाने कृमिनाशक असून ताप, बद्धकोष्ठता, दमा, उचकी यावर गुणकारी आहेत. करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक असते. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात. करटोलीची फळे पावसाळ्यात बाजारात येतात. ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी. 


बाजारपेठेत चांगली मागणी

येथील बाजारपेठेत या भाजीची मागणी चांगली असते. गुजराथ भागातून ही भाजी सोलापूर बाजारात येत असते. या वेळी माल वाहतूक सुरळीत नसल्याने उशीरा दाखल होईल.

- साैदागर गोचडे, विक्रेता, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com