सोलापुरात एक लाख नागरिकांची होणार रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टनंतर सोलापूरबाबतीत काय निर्णय घ्यायचा याबाबत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, अशी माहितीही पालकमंत्री भरणे यांनी आज दिली. 

सोलापूर : लॉकडाउन करणे ही काय आनंदाची बाब नाही. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासन काम करत आहे. परंतु त्यातून समाधानकारक रिझल्ट मिळत नाहीत. सध्या तूर्तास सोलापुरात लॉकडाउनचा विचार नाही. नागरिकांनी शिस्त पाळावी. नागरिकांनी शिस्त नाही पाळली तर नाइलाजास्तव कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टनंतर सोलापूरबाबतीत काय निर्णय घ्यायचा याबाबत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, अशी माहितीही पालकमंत्री भरणे यांनी आज दिली. 

हेही वाचा : ...तर गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवू 

श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर श्री. भरणे यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. 
श्री. भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करायचा का, याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून सर्वांची मते जाणून घेतली. मात्र सोलापूर शहरामध्ये पुन्हा लॉकडाउन न करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून सुमारे एक लाख नागरिकांना इतर आजार (को-मॉर्बिड) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व नागरिकांची दिवसात रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टमुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. ही टेस्ट आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात येणार आहे. तसेच ही टेस्ट करण्यासाठी पोलिस आयुक्तालय आणि महापालिका एकत्रितरीत्या आराखडा तयार करणार आहेत. यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाला विशेष मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. 

हेही वाचा : उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल..! 

पालकमंत्री म्हणाले... 

  • टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांचे होणार अलगीकरण 
  • कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल 
  • सर्वेक्षणाला जाणाऱ्या पथकावर हल्ला करणे गंभीर; जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना लक्ष घालण्याची सूचना 
  • महापालिकेला निलंबित असलेले अधिकारी मिळाले कसे? याची माहिती घेऊ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh citizens to undergo Rapid Antigen Detection Test in Solapur