आरोग्य यंत्रणाच सलाईनवर ! राज्यात साडेचार हजार लोकांमागे एक डॉक्‍टर 

तात्या लांडगे
शनिवार, 28 मार्च 2020

  • पावणेतीन लाख डॉक्‍टरांच्या हाती राज्याची आरोग्य सेवा 
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रानुसार हवा आहे एक हजार लोकांमागे एक डॉक्‍टर 
  • कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सेवानिवृत्त डॉक्‍टरांचा शोध 
  • सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्‍टरांसह स्पेशालिस्टची भरमसाठ पदे रिक्‍त 

सोलापूर : राज्यात ऍलोपॅथिक, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्‍टरांची एकूण संख्या दोन लाख 84 हजार 400 इतकी आहे. एक हजार लोकांमागे एक डॉक्‍टर, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सूत्र आहे. मात्र, महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला या सूत्राचा विसर पडला असून तब्बल साडेचार हजार लोकांमागे एक डॉक्‍टर, असे चित्र असल्याचे समोर आले आहे. डॉक्‍टरांच्या रिक्‍त पदांमुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता सेवानिवृत्त डॉक्‍टरांचा शोध सुरु झाला आहे. 

हेही नक्‍की वाचा : टपाल खात्याचा मोठा निर्णय ! ज्येष्ठांसह दिव्यांगांना मिळणार घरपोच पैसे 

राज्यातील 45 कामगारांची नोंदणी असलेल्या 15 विमा रुग्णालयांसाठी 366 डॉक्‍टरांची पदे मंजूर आहेत. तर स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची 135 आणि निवासी स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची 29 पदे मंजूर आहेत. या रुग्णालयांमध्ये दोन हजार 682 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून खाटांची संख्या दोन हजार 280 इतकी आहे. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी विमा रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष उघडण्यात आले आहेत. तर राज्यात 23 जिल्हा व 91 उपजिल्हा रुग्णालये आहेत. तसेच एक हजार 828 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 10 हजार 668 उपकेंद्रे आहेत. वास्तविक पाहता कोरोनासारख्या वैश्‍विक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा सक्षम असणे क्रमप्राप्त आहे. मात्र, मागील काही वर्षांत कोट्यवधींचा निधी खर्चून सरकारी दवाखान्यांच्या इमारती उभारल्या मात्र, डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांची भरती केली गेली नाही. दरम्यान, आता कोरोनाच्या भितीने डॉक्‍टरांनी बहूतांश खासगी रुग्णालये बंद ठेवली आणि सरकारी रुग्णालयांवरील ताण वाढू लागला. त्यामुळे सरकारने खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा सुरु झाली. कोरोनासारख्या वैश्‍विक संकटातून धडा घेवून राज्य सरकार आता आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. 

हेही नक्‍की वाचा : कृपा पांडूरंगाची ! सोलापूर कोरोनापासून दूरच 

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रानुसार नाहीत डॉक्‍टर 
जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रानुसार एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्‍टर असणे अपेक्षित आहे. राज्यात होमिओपॅथिक डॉक्‍टरांची संख्या 73 हजारांपर्यंत असून आयुर्वेदिक डॉक्‍टर 80 हजार आहेत. तर युनानी डॉक्‍टरांची संख्या 1400 पर्यंत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूत्रानुसार आपल्याकडे डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. 
- डॉ. कुलदिप कोहली, संचालक, आयुर्वेद, महाराष्ट्र 

हेही नक्‍की वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी ! 260 कोटींची मदत 

राज्याची आरोग्य सेवा 
राज्याची लोकसंख्या (2019) 
12,66,31,434 
डॉक्‍टरांची एकूण संख्या 
2,84,400 
अंदाजित खासगी दवाखाने 
32,200 
जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये 
114 
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे 
12,496  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A doctor behind the state of four and a half thousand people