नागरिकांनो सावधान ! जलजन्य आजार होऊ नयेत यासाठी प्या पाणी उकळून व गाळून

water
water

केत्तूर (सोलापूर) : सध्या सर्वत्र पावसाची बरसात सुरू आहे. शहरी व ग्रामीण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजना, धरणे, विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. जलस्रोतामध्ये नवीन पाणी आल्यामुळे हे पाणी गढूळ व दूषित झालेले आहे. बहुतांश ठिकाणी (काही अपवाद वगळता) जलशुद्धीकरण यंत्रणेविनाच हेच पाणी नागरिक पिण्यासाठी थेट वापरत असल्याने नागरिकांना जलजन्य आजार वाढण्याची शक्‍यता आता बळावली आहे. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. 

बहुतांश ग्रामीण भागात जलशुद्धीकरण यंत्रणाच कार्यान्वित नाहीत. या ठिकाणी तुरटी अथवा क्‍लोरीन टाकणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याच्या तक्रारी वाढतात, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून जनजीवन विस्कळित झाले आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच आता जलजन्य आजार वाढून आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

80 टक्के आजार हे पाणी दूषित पाण्यामुळे होतात. पाण्यामधून दूषित पदार्थ शरीरात जातात त्यामुळे निश्‍चितच शरीरावर याचा परिणाम होतो. तसेच पाण्यामध्ये निसर्गनिर्मित व मानवनिर्मित औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) दूषित पाणी प्रक्रियेविना थेट नदीपात्रात सोडले जाते. हेही पाणी दूषित होण्याचे मुख्य कारण आहे. तसेच शहरी भागातील सांडपाण्याबरोबरच सध्या कोरोना महामारीमुळे साबण, सॅनिटाझरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हे दूषित पाणीही मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे. त्यामुळे पाण्याच्या दूषितपणात प्रचंड वाढ झाली आहे. दूषित पाण्याचा जलाशयातील जीवजंतूंवरही विपरीत परीणाम होऊ लागला आहे. परंतु या दूषित पाण्याकडे ना प्रदूषण नियंत्रणाचे लक्ष आहे, ना शासनाचे, ना आरोग्य विभागाचे. प्रशासन दूषित पाण्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहात नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. 

याबाबत केत्तूरचे डॉ. दिलीप कुदळे म्हणाले, दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी आजार प्रामुख्याने होतात. हे होऊ नयेत यासाठी घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याचे भांडे स्वच्छ धुवा व हाताची स्वच्छता ठेवा. 

केत्तूरच्या माजी सरपंच अर्चना पाटील म्हणाल्या, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे पाणी गढूळ व दूषित झाले आहे. प्रशासनाने हे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरवठा करावा. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com