"या' रोगांनी काढले पुन्हा डोके वर; द्राक्षबागा अन्‌ "या' पिकांवरही केलाय ऍटॅक! 

संतोष सिरसट 
Friday, 7 August 2020

मागील द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या काळात कोरोनाची सुरवात झाल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा विक्रीविना तशाच राहून गेल्या. त्यावर पर्याय म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा करण्यावर भर दिला. पण, बेदाण्याचे बाजारही सध्या बंद-चालूच्या स्थितीत आहेत. त्यामुळे बेदाणा तयार असूनही तो शेतकऱ्यांना विक्री करता येत नाहीत. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडला आहे. बेदाण्याचे भावही कमी झाल्याने नेमके करावे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच आता डाउनी व करप्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

सोलापूर : सध्या दररोजच लहान-मोठा पाऊस येत आहे. त्यामुळे द्राक्षबागा, टोमॅटो, ढोबळी मिरची यांसारख्या पिकांवर डाऊनी व करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दररोजच पिकांवर फवारणी करावी लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

हेही वाचा : परिस्थितीवर मात करत मल्लम्मांनी भजनाच्या माध्यमातून उभा केला जीवनाचा आदर्श ! 

मागील द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या काळात कोरोनाची सुरवात झाल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा विक्रीविना तशाच राहून गेल्या. त्यावर पर्याय म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा करण्यावर भर दिला. पण, बेदाण्याचे बाजारही सध्या बंद-चालूच्या स्थितीत आहेत. त्यामुळे बेदाणा तयार असूनही तो शेतकऱ्यांना विक्री करता येत नाहीत. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडला आहे. बेदाण्याचे भावही कमी झाल्याने नेमके करावे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच आता डाउनी व करप्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

हेही वाचा : ई-पासबद्दल सोशल मीडियावर होणाऱ्या अफवांबद्दल पोलिसांनी काय मांडली भूमिका? 

जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली सुरवात केली. पाऊस मोठ्या प्रमाणात जरी झाला नसला तरी पिकाला उपयुक्त असा झाल्याने खरीप हंगामातील पिके जोमात आहेत. मात्र, बागायतीमध्ये असलेल्या पिकाला या दररोजच येणाऱ्या पावसाचा मोठाच फटका बसला आहे. जिल्ह्यात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष बागांवर डाउनी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दररोजच औषधांची फवारणी करून सुद्धा त्यावर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांना शक्‍य झालेले नाही. या रोगांसाठी दररोज नवीन औषधांची फवारणी शेतकरी करत आहेत. 

द्राक्ष बागायतदार सारंग पाटील म्हणाले, आमच्याकडे द्राक्षाची बाग आहे. बागेवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काय फवारणी करावे हे सुचेनासे झाले आहे. हे वातावरण खूपच खराब आहे. त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागत आहे. 

ढोबळी उत्पादक शेतकरी समाधान वाघ म्हणाले, माझ्याकडे द्राक्ष बाग व ढोबळी मिरची आहे. या वातावरणामुळे मिरचीवर ओला करपा पडला आहे. सुरवातीला एका ठिकाणी असलेला हा रोग आता सगळ्या प्लॉटवर झाला आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड झाले आहे. दररोजच फवारणी करत आहे. ऊन-पावसाचा खेळ चालू असल्याने अशी स्थिती झाली आहे. 

शेतकरी दयानंद भोसले म्हणाले, माझ्याकडे द्राक्ष बागेबरोबर ढोबळी मिरचीही आहे. व्याजाने पैसे काढून ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. साधारण एक महिना लागवडीला झाला आहे. पण, सध्याच्या खराब वातावरणामुळे मिरचीवर करप्या व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे हे पीक हातात येण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Downy, mildew attack on vineyards, tomatoes and chillies due to daily rains