विलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला लावतो हा कोरोना ! डॉ. प्रमोद धामणगावकरांचे अनुभवाचे बोल

Dr. Dhamangaonkar
Dr. Dhamangaonkar

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "देह हे काळाचे धन कुबेराचे । येथे मनुष्याचे काय आहे ।।' या संतोक्तीची अन्‌ उद्याचा कसलाही भरवसा नाही याची पदोपदी जाणीव होत असतानाच, जगण्यासाठीची लढाई मात्र सुरू होती. या लढाईत तत्काळच्या उपचारासह महाभयंकर रोगाशी दोन हात करण्याचे बळ केवळ कायमचा सकारात्मक विचार आणि अनेकांचे मिळालेले सहकार्य यामुळेच मिळाले, असा अनुभव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद धामणगावकर यांनी "सकाळ'शी बोलताना शेअर केला. 

तर मी सर्वांना कोरोना संसर्गाचा प्रसाद वाटत हिंडलो असतो
"रुग्णसेवा हीच ईशसेवा' मानल्याने आलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्याचे काम क्रमप्राप्त होते. त्यानुसार आम्ही दोघे मी व माझी पत्नी डॉ. मंजिरी दररोजच्या कामात व्यस्त असायचो. एक दिवस मला माझ्या घशात खरखर होत असल्याची जाणीव झाली. लक्षण अगदी किरकोळ होते. फक्त घसा खरखर करत होता. त्यामुळेच माझ्याकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु पत्नी डॉ. मंजिरीने हट्ट धरून टेस्टिंगसाठी नेले अन्‌ तपासणीअंती मी कोरोना पॉझिटिव्ह आलो. त्यामुळे कोणतेही किरकोळ लक्षणही आपल्याला या महाभयंकर रोगाकडे नेणारे ठरू शकते, हेच जाणवले. लवकर निदान झालेच नसते तर मी सर्वांना कोरोना संसर्गाचा प्रसाद वाटत हिंडलो असतो. 

कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच अन्य डॉक्‍टर मित्रांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानुसार अनेकजण मदतीसाठी धावून आले. औषधोपचाराला सुरवातही झाली. या बाह्य मदतीबरोबरच माझ्या अंतर्मनाने खंबीर बनत आपण यातून बाहेर पडायचेच, असा निश्‍चय केला. त्यामुळे उपचारासह अनेकांचे मदतीचे हात अन्‌ मनात निर्माण झालेली सकारात्मकता या रोगाशी लढा देण्यासाठी उपयोगी पडल्याचे डॉ. धामणगावकर सांगत होते. 

तपासणीअंती 24 ऑगस्ट रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न होताच डॉ. राघवेंद्र कुलकर्णी यांनी औषधे व इतर आध्यात्मिक मदत ताबडतोब घरपोच आणून दिली. डॉ. जयंती आडके यांनी योग्य मार्गदर्शन केले. आता प्रश्न होता उपचार कुठे घ्यायचे? कसे घ्यायचे? मग लगेच मी कोणत्याही अडचणीच्या क्षणी मदतीला धावणारा, माझा बेस्ट फ्रेंड व शिकत असतानापासूनच माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणारा माझा मित्र डॉ. माणिक गुर्रम याच्याशी संपर्क केला. तो मार्कंडेय सहकारी रुग्णालयात असल्याने त्याने सगळी सोय त्वरित केली. पण त्याच्या व सर्व मित्रांच्या सल्ल्याने असे ठरले, की लक्षणे अगदी सौम्य असल्याने घरीच उपचार करता येतील. याशिवाय मी स्वतः व पत्नी डॉ. मंजिरी डॉक्‍टर असल्याने मॉनिटरिंग पण व्यवस्थित होईल. त्यामुळे घरीच आयसोलेट झालो. 

पॅथॉलॉजिस्ट डॉ. भारत मुळे यांनी सुरवातीचे रिपोर्ट दिले. त्यानंतरच्या तपासण्या करण्यासाठी डॉ. नीलकंठ व त्यांचा पुतण्या ऋषी यांचे सहकार्य मिळाले. डॉ. सुजाता कुलकर्णी व दाराशा हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद शहा, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. विक्रम हिरेकेरूर, डॉ. विक्रम निकम, डॉ. संजय आडके, डॉ. महेबूब बसाडे, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. संगीत शेलार, डॉ. अशित मेहता, डॉ. विद्यानंद चव्हाण यांची मोलाची साथ व मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. धामणगावकर यांनी सांगितले. 

घरीच आयसोलेट झाल्याने माझे उपचार माझी पत्नी डॉ. मंजिरी करीत होती. परंतु या उपचाराच्या काळात कोरोनाने तिलाही गाठले अन्‌ ती 26 ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. आम्ही दोघे कोरोनाग्रस्त झाल्याने, आयुष्य म्हणजे क्षणभंगुर असून याचा कसलाही भरवसा नसल्याचे जाणवत होते. परंतु लढाई जिंकण्याचा निश्‍चय करीत डॉ. मंजिरीची बेस्ट फ्रेंड, सिव्हिल हॉस्पिटलच्या प्राध्यापिका डॉ. अनिता बंदिछोडे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या अत्यंत तज्ज्ञ व डाऊन टू अर्थ असलेल्या उपचारांमुळे आम्ही खूप लवकर बरे झालो. कमीतकमी व अत्यंत सौम्य औषधे त्यांनी दिली. मुख्यतः न कंटाळता त्यांचे सकारात्मक बोलणे यामुळे निम्मा आजार गेला. त्यांना केव्हाही फोन केला तरी अत्यंत प्रेमाने व आत्मविश्वासाने त्यांनी आम्हाला धीर दिला. डॉ. अनिता बंदिछोडे मॅडम नसत्या तर फार अवघड झाले असते. डॉ. अनिता मॅडमचे उपकार फेडणे अवघड असल्याचे डॉ. धामणगावकर यांनी सांगितले. 

"ऍक्‍टिव्ह फेज' निघून गेला पण लक्षणे काही संपत नव्हती. ताप, खोकला काही अंशी सुरूच होता. या टप्प्यावर माझे मित्र आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन कुलकर्णी हे मदतीला धावले. त्यांच्या गोळ्या, औषध व चूर्ण यामुळे 24 तासांत फरक पडला. एकदम सगळी लक्षणे गायब झाली. श्री श्री रविशंकरजी यांचीही औषधे कामी आली. 
माझे राहण्याचे ठिकाण नवी पेठेत आहे. हा प्रभाग बाळी वेसच्या महापालिका साबळे दवाखान्याअंतर्गत असल्याने त्याचे प्रभारी डॉ. किरण गजधाने यांनीही सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या सकारात्मक बोलण्याने खूप बरे वाटले. सरकारला नावे ठेवणे सोपे आहे पण सरकार खूप काही करत असते हेही आम्ही यानिमित्ताने अनुभवल्याचे डॉ. धामणगावकर यांनी सांगितले. 

या सगळ्या अचानक कोसळलेल्या संकटात, केव्हाही काहीही होऊ शकते याची जाणीव झाली. अशाही संकटात ज्यांच्या वैचारिक उपदेशाचा आधार होता असे माझे सद्‌गुरुदेव श्रीनिवास काटकर यांची कृपा सतत, प्रत्येक क्षणी सोबत होती, आहे व राहील याची ठाम खात्री आहे. त्यांनी जे विचार धन त्यांच्या प्रवचनातून, सहवासातून दिले त्यामुळे कसलेच भय नव्हते व नाहीही. त्यांच्या आध्यात्मिक विचारामुळे मन शांत राहिले. निगेटिव्ह विचार फिरकला सुद्धा नाही. जे होईल ते कल्याणाचेच व चांगले होईल हा सकारात्मक भाव कायम होता. याच विचारावर मन ठाम राहिले. त्यामुळे या सकारात्मक विचारासह वेळेत मिळालेले सर्व प्रकारचे उपचार व डॉक्‍टर मित्रांसह परिवारातील सर्वांची मिळालेली साथ जगण्याचे वेगळे बळ देऊन गेल्याचे डॉ. धामणगावकर यांनी सांगितले. 

जे करायचे ते आजच... 
"एक मात्र जाणवले, की मृत्यू अगदी अनपेक्षित आहे हे अगदी अटळ वास्तव आहे. त्यामुळे जे काही करायचे असेल व्यावहारिक किंवा विशेषतः पारमार्थिक ते मनात येताच ताबडतोब केले पाहिजे. उद्याचा कसलाही भरवसा नसतो हे अगदी स्पष्ट जाणवले. त्यामुळे जे करायचे ते आजच करूया. किती का त्रास होवो, करायचे ते आजच. काय माहीत उद्या मी असेन की नसेन. ज्याची माफी मागायची किंवा ज्यावर प्रेम करायचे तो उद्या असेल की नसेल माहीत नाही, त्यामुळे आज आणि आत्ताच करायचे, हे पक्के समजले. त्याचा विसर न पडू म्हणजे झालं, अशी भावोत्कट भावना डॉ. धामणगावकर यांनी व्यक्त केली. 

हे मात्र नक्की करा 
आपले सगळे व्यवहार पत्नी किंवा कुणी तरी विश्वासू व्यक्तीस माहीत असलेच पाहिजेत याची जाणीव प्रकर्षाने झाल्याने हे सर्व पत्नीला किंवा जवळच्या व्यक्‍तीस सांगा. कुणाकडूनचे येणे, कुणाचे देणे, बॅंकेतील किंवा अन्य ठिकाणची गुंतवणूक, सगळे पासवर्डस, सगळी गुपिते आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला सांगितले पाहिजेत हे जाणवले. ही माहिती हवी तर एका सील केलेल्या पाकिटात ठेवा पण ती योग्य वेळी त्या विश्वासू व्यक्तीला हाती लागतील अशी ठेवलीच पाहिजे. नाहीतर उशाशी विहीर असून तहानेने मरायची पाळी आपल्या माघारी आपल्या कुटुंबीयांवर येऊ शकते. मला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय झाला तेव्हाच मी सगळे लिहून घरात ठेवले. सगळ्या चेक बुकमधील दोन-दोन चेकवर सह्या करून सुरक्षित ठेवली. मोबाईलचे व अन्य लॉक पण सांगून ठेवले. आजारातून माघारी येणार की नाही माहीत नसल्याने हे करावे लागले. परंतु सुखरूप माघारी आलो. सावधगिरी बाळगणे अत्यंत जरुरीचे असल्याने हे केल्याचे डॉ. धामणगावकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, एकूणच हा आजार विलक्षण नग्न सत्ये समोर आणून स्वीकारायला लावणारा आहे हे नक्की. त्यात भिण्यासारखे खरेच काही नाही. पण आपली स्वतःची, कुटुंबाची अन्‌ समाजाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. योग्य आहार, निर्व्यसनी जीवन, नित्य व्यायाम व आरोग्यविषयक नियम पाळणे यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो. हल्ला झालाच तर तो सौम्य करू शकतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com