डॉ. माधवराव पोळ म्हणाले, वीस वर्षांनंतर प्रत्येक घरात एक पेशंट कॅन्सरचा असणार !

Cancer.j
Cancer.j

नातेपुते (सोलापूर) : आजपासून फक्त 20 वर्षांनंतर प्रत्येक घरात एक पेशंट कॅन्सरचा असणार. आज ही गोष्ट कुणाला खरी वाटणार नाही; पण हे शंभर टक्के सत्य आहे, असे परखड मत बालरोगतज्ज्ञ व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉ. माधवराव पोळ यांनी व्यक्त केले. 

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे झूम ऍपद्वारे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात डॉ. पोळ बोलत होते. या वेळी लाखो साधकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. 

डॉ. पोळ यांनी सांगितले, की 20-25 वर्षांपूर्वी अनेक संशोधक, अभ्यासक सांगत होते, रासायनिक खतांचे- औषधांचे भविष्यात खूप भयंकर वाईट परिणाम दिसणार आहेत. पण तेव्हा ते कुणाला खरे वाटले नव्हते. आज प्रत्येक घरात एक तरी पेशंट डायबेटिस, ब्लडप्रेशर, हृदय आजार, ट्यूमरने ग्रस्त आहे. 40 वर्षांपुढील 40 टक्के लोकांना डायबेटिस आहे. 25 टक्के लोकांना ब्लडप्रेशर आहे. 10 टक्के लोकांना ट्यूमर आहे. पाच टक्‍के लोकांना कॅन्सर आहे, पाच टक्के लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, 5 टक्के लोकांना पॅरालिसीस आहे, पाच टक्के लोकांना इतर आजार आहेत, तीन टक्के लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे तर फक्त दोन टक्के लोकच नॉर्मल जगत आहेत. 

आपले जीवन सुखकर निरोगी बनवायचे असेल तर शुद्ध अन्न आणि पाणी हीच काळाची गरज आहे. पाणी आपण फिल्टरचे पिऊ पण अन्नाचे काय? ते कसे शुद्ध करणार? ते शुद्ध अन्नधान्य पिकविणे फक्त शेतकऱ्यांच्याच हातात आहे. शेतकरी कुणा एकट्याचे ऐकत नाहीत. सर्व समाजाने जागरूकता दाखवून यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देखील दिला पाहिजे तरच हे शक्‍य आहे. सेंद्रिय शेती - ऑरगॅनिक फार्मिंग, निसर्ग शेती, झिरो बजेट शेती, रसायनमुक्त शेतीचे महत्त्व त्यांना पटवून द्यायला हवे. 

आपला विश्वास बसणार नाही, 90 टक्के शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीवर विश्वासच नाही. रासायनिक खते व कीटकनाशके औषधांशिवाय शेती ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. 
पुढील दुष्परिणामांची त्यांना अजिबात चिंता नाही. आज माझे पीक चांगले आले पाहिजे, हाच विचार त्यांच्या डोक्‍यात असतो आणि त्यासाठी वाटेल ती भयानक विषारी कीटकनाशके औषधे, खते ते वापरत असतात. 

घरात एकाला जरी कॅन्सर झाला तर त्याला वाचविण्यासाठी 50 लाख खर्च येतो. त्याच्या उपचारासाठी तीन-चार एकर शेती विकावी लागेल. याचा तरुण शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. नंतर आपल्याला दुसऱ्याच्या शेतात काम करून पोट भरावे लागेल, हे नक्की. यासाठी वेळीच सावध झाले पहिजे. शेणखत - कोंबडीखत - बकरीचे लेंडीखत, गोमूत्र, बाजारातही अनेक सेंद्रिय / जैविक खते मिळतात आणि ती रासायनिक खतांपेक्षा स्वस्त सुद्धा आहेत. आज आपल्या कर्मावरच देशाचे भविष्य अवलंबून आहे. 

तरुणांनी, शेतकरी बंधूंनी व समाजानेही जरूर याचा विचार करून शेतकरी प्रबोधनाची चळवळ राबवायला हवी. "सशक्त भारत- समृद्ध भारत- निरोगी भारत' घडवायचा असेल, तर अशा विचारांचा प्रसारमाध्यमांमध्ये प्रसार करायला हवा. ते आपले सर्वांचे कर्तव्यच नाही तर ती आता आपली गरजही झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com