व्यापाऱ्यांनो, दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची घ्या दक्षता : प्रांताधिकारी-ढोले 

अभय जोशी 
Tuesday, 3 November 2020

दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानांत नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी पालन करावे तसेच दुकानांत गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानांत नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी पालन करावे तसेच दुकानांत गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

दिवाळी सणानिमित्त कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, पोलिस निरीक्षक अरुण पवार तसेच शहरातील व्यापारी व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रांताधिकारी श्री. ढोले म्हणाले, दिवाळी सणानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी दुकानांत गर्दी होत असल्याने व्यापाऱ्यांनी आवश्‍यक ती काळजी घ्यावी. दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी मास्कचा वापर करावा तसेच त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. येणाऱ्या ग्राहकास सुरक्षित अंतर ठेवून वस्तूची देवाण- घेवाण करावी. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. मास्क लावले नसेल तर दुकान प्रवेश देऊ नये. शक्‍यतो ग्राहकांना माल घरपोच मिळेल याबाबत नियोजन करावे, असेही श्री. ढोले यांनी सांगितले. 

हिवाळ्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत असते. नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी. फटाक्‍यांमुळे ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होऊन लहान मुले, ज्येष्ठ तसेच श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही श्री. ढोले यांनी या वेळी केले. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांबरोबच परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड कामगारांचीही गर्दी वाढत आहे. दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राहकांना शक्‍यतो घरपोच वस्तू पोचवाव्यात, यासाठी व्हॉट्‌सऍप व इतर इंटरनेट सुविधांचा वापर करावा. जे दुकानदार प्रशानाच्या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. 

दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेतील व इतर ठिकाणी माल वाहतुकीसाठी अवजड वाहनांना सकाळी अर्धा तास व दुपारी अर्धा तास असा एक तासाचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त सुधारित वेळेनुसार सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत अवजड वाहनांना वेळ देण्यात आली आहे. या वेळेतच व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तूंचा चढ-उतार करावा. तसेच या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा येऊन वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री. कदम यांनी या वेळी दिल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Diwali, the shops in Pandharpur are getting crowded