"मघा आणि ढगाकडे बघा' अशी झाली मोहोळ तालुक्‍याची परिस्थिती !

राजकुमार शहा 
Wednesday, 2 September 2020

मोहोळ तालुक्‍याची पावसाची सरासरी साडेपाचशे मिलिमीटर इतकी आहे. अद्यापपर्यंत 355 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर अद्यापही काही भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बोअर व विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. 

मोहोळ (सोलापूर) : गेल्या आठ दिवसांपासून कडक उन्हाची तीव्रता वाढली असून, शेतात उभी असलेली पिके उन्हाच्या तडाख्याने सुकू लागली आहेत. जुन्या म्हणीनुसार "मघा आणि ढगाकडे बघा' अशी परिस्थिती मघा नक्षत्रात निर्माण झाली आहे. दरम्यान, बैलपोळा झाल्यानंतर मोहोळ तालुक्‍यात ज्वारी पेरणीला प्रारंभ होत असतो, मात्र पाऊस थांबल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमिनी मशागती करून तयार ठेवल्या आहेत. 

हेही वाचा : धक्कादायक ! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन बालकांना मातेने दिले दुसऱ्यांच्या ताब्यात 

मोहोळ तालुक्‍याची पावसाची सरासरी साडेपाचशे मिलिमीटर इतकी आहे. अद्यापपर्यंत 355 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अनेक भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर अद्यापही काही भागात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बोअर व विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. मात्र अद्यापपावेतो एकही मोठा पाऊस झाला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे त्यांनी कांदा, ऊस, मका लागवड सुरू केली आहे. कांद्याच्या रोपांचा सारा 600 ते 800 रुपये किमतीला विकला जात आहे. 

हेही वाचा : "उजनी' शंभर टक्के भरताच धरणग्रस्तांनी केले ढोल-ताशाच्या गजरात जलपूजन 

तालुक्‍यात तीन साखर कारखाने असल्याने उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या तालुक्‍यात डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ या फळबागांचेही क्षेत्र विस्तारले आहे. फळबागांबरोबर शेवंती, झेंडू यांची फुलशेतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धती सोडून नवीन पद्धती स्वीकारत आहे. टोमॅटो, वांगी, कांदा, काकडी हा भाजीपाला पिकविण्यात मोहोळ तालुका जिल्ह्यात वरच्या क्रमांकावर आहे. पापरी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र वाढीस लागल्याने व स्थानिक मजुरांना द्राक्षबागेचे काम जमत नसल्यामुळे पुणे जिल्ह्यातून मजूर कामासाठी आणले जात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lack of rain in Mohol area sowing of crops stopped